लोकप्रतिनिधी जर याच व्यवस्थेद्वारे जनकल्याणासाठी राबत असतील, तर त्यांना पक्षांतर करण्याची गरज का भासते, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळेच जनतेप्रती राजकीय नेत्यांचे उत्तरदायित्व किती, हा मुद्दा भारतीय समाजमनाला दिवसेंदिवस अस्वस्थ करत चालला आहे. आपण लोकशाहीचे जे प्रारूप स्वीकारले आहे, ते जगात आदर्श मानले जाते. जनतेचा विश्वास संपादन करणे आणि लोककल्याणाची कामे अव्याहतपणे करणे, हाही या व्यवस्थेचा अर्थ आहे.
आधुनिक भारतीय राजकारणाच्या इतिहासात 1963 या वर्षाला विशेष महत्त्व आहे.कारण, या वर्षापासून देशात बिगरकाँग्रेसवाद फोफावत गेला. त्याला समाजवादी विचारसरणी पर्याय ठरली. या माध्यमातून डॉ. राममनोहर लोहिया आणि राष्ट्रवादी विचारांचे नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय एकत्र आले. पाठोपाठ या दोन्ही नेत्यांनी लोकसभेच्या चार पोटनिवडणुकांत काँग्रेसला केवळ आव्हान दिले असे नव्हे, तर इतिहास रचला. यातील वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी म्हणजे मुस्लिमबहुल मतदारसंघ असूनही डॉ. लोहिया यांनी समान नागरी कायद्याचा आग्रह जाहीररीत्या धरला, तर उपाध्याय यांनी ब्राह्मणांच्या नावे मते मागण्यास जौनपूरमधून सपशेल नकार दिला.याचा परिणाम असा झाला की,लोहिया यांना निसटता का होईना विजय मिळाला. मात्र, उपाध्याय यांना पराभवाचा सामना करावा लागला. या दोघांनीही आपल्या राजकीय मूल्यांशी तडजोड करण्यास नकार दिला, हे विशेष.
विचारसरणीला रजा अन् जिंकण्याची मजा
या पार्श्वभूमीवर सध्याच्या राजकारणाचा विचार केला तर विचासरणीने केव्हाच मान टाकली आहे. निवडून येणे किंवा निवडणुका जिंकणे हाच विद्यमान राजकारणाचा गाभा बनला आहे. त्यामुळे जेव्हा निवडणुका जवळ येतात, तेव्हाच राजकीय पक्षांचे अस्तित्व ठळकपणे जाणवू लागते. सध्याची निवडणूक त्याला अपवाद नाही. आयाराम-गयाराम हे सत्र जवळपास प्रत्येक पक्षात सुरू आहे. भिंग घेऊनच याला अपवाद शोधावा लागेल. ताज्या घडामोडी पाहिल्या तर पंजाबमधील खासदार रवनीत बिट्टू, त्याच प्रदेशातील काँग्रेसच्या राज्यसभा खासदार परणीत कौर, झारखंडच्या सीता सोरेन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शिबू सोरेन यांच्या स्नुषा असलेल्या सीता सोरेन यांना तर लगेचच दुमका मतदार संघातून उमेदवारीही देण्यात आली आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांची पत्नी गीता यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, हे केवळ भाजपच्या बाबतीत घडलेले नाही. भाजपचे झारखंडमधील प्रभावशाली नेता जयप्रकाश पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तेलंगणातील भाजप नेता सतीश मडीगा यांनीही काँग्रेसचा हात जवळ केला आहे. राष्ट्रीय जनता दल, जनता दल संयुक्त या पक्षांतही ये-जा सुरूच आहे.
वैचारिक मूल्ये भुईसपाट
राजकारणात प्रत्येक पक्षाची स्वतंत्र विचारसरणी असते. त्या आधारेच त्या पक्षाचे कामकाज चालविले जाते. संबंधित पक्षाचे नेते, कार्यकर्ते या विचारसरणीशी एकनिष्ठ असतात, असे मानले जाते. मात्र, काळाच्या ओघात नीतिमत्ता, सदाचरण, पक्षनिष्ठा यासारखी मूल्ये उद्ध्वस्त होत चालल्याचे दुर्दैवी चित्र पाहायला मिळते. आजकाल पक्षांतरे एवढी झपाट्याने होऊ लागली आहेत की, अनेकदा संबंधित नेत्यालाही आपण नेमके कोणत्या पक्षात आहोत, हेच कळेनासे होते. यात खरी कोंडी होती ती समर्पित कार्यकर्त्यांची. अहोरात्र कष्ट उपसून पक्ष वाढविलेल्या या कार्यकर्त्यांना कानामागून येऊन तिखट झालेल्या नेत्यांचा प्रचार नाईलाजाने करावा लागतो. शिवाय मतदारांना कसे सामोरे जायचे, हा प्रश्नही त्याला अस्वस्थ करून सोडतो. कारण कालपर्यंत ज्याला विरोध केला, त्याच नेत्यासाठी मते मागताना या सच्च्या कार्यकर्त्याला ओशाळल्यासारखे होते. अंतिमतः त्याला पक्षश्रेष्ठींकडून आलेला आदेश शांतपणे मान्य करून दिलेली जबाबदारी पार पाडावी लागते.
नरेंद्र मोदींचा करिष्मा केंद्रस्थानी
भारतीय राजकारणात विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा अतुलनीय आहे. अन्य कोणत्याही नेत्याला आजच्या घडीला त्यांच्याएवढी लोकप्रियता मिळवता आलेली नाही. त्यामुळे जर आपल्याला राजकीय करिअर घडवायचे असेल, तर भाजपला पर्याय नाही, असा विचार करून विरोधी पक्षांतील अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करू लागले आहेत. भाजपसाठी ही गौरवाची किंवा कौतुकाची बाब असली तरी यातील किती जणांना भाजपची खरी तत्त्वे माहीत आहेत, हा विचार करण्यासारखा मुद्दा ठरावा.