Lok Sabha Election 2024 : उमेदवार बदलून शिवसेना राखणार रामटेकचा गड?

Lok Sabha Election 2024 : उमेदवार बदलून शिवसेना राखणार रामटेकचा गड?

रामटेक : उमेदवार काँग्रेसचा, चिन्ह शिवसेनेचे आणि प्रचाराचीच नव्हे, तर निवडून आणण्याची जबाबदारी भाजपची, हे अशक्य वाटणारे समीकरण नागपूर जिल्ह्यात रामटेक मतदार संघात सध्या चर्चेत आहे. उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे यांच्या हाती शिवसेनेचा भगवा झेंडा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना उमेदवार करण्याचे धोरण स्वीकारले असले, तरी शिवसेनेतील उठाव होत असताना मुख्यमंत्री शिंदे यांची साथ देणार्‍या, माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांचा पराभव करीत दोनदा विजयी झालेल्या खा. कृपाल तुमाने यांना तिकीट नाकारत शिवसेना रामटेकचा गड राखणार का, हा खरा प्रश्न आहे. काँग्रेसचे आमदार राजू पारवे आता रामटेक लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार म्हणून काँग्रेस उमेदवार जि.प. माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांच्यापुढे उभे ठाकणार आहेत.

गेले काही दिवस त्यांच्या उमेदवारीवरून महायुतीत घमासान सुरू होते. सुरुवातीला भाजपने या मतदार संघावर दावा ठोकला, प्रचार सुरू केला. नंतर शिवसेनेने हा मतदारसंघ ठेवावा, पण जनतेत नाराजी असल्याने शिवसेनेचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांच्याऐवजी दुसरा उमेदवार द्या, अशी मागणी भाजपने पुढे केली. दरम्यान, आ. राजू पारवे यांना तिकीट देण्यावरून शिंदे गटात तसेच भाजपमध्येही अंतर्गत धुसफूस सुरू झाली. नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदार संघावरून दोन्हीकडे नाराजी आहे. शिंदे गटाने सत्ता, नेतृत्वबदल उठाव केला, त्यावेळी जे 13 खासदार शिंदे यांच्यासोबत गेलेत, त्यामध्ये कृपाल तुमाने यांचा प्राधान्याने समावेश होता. आपल्या सर्व खासदारांना तिकीट मिळणारच, कामाला लागा, असे आश्वासन दिल्याने तुमाने निश्चित होते. मात्र, अपेक्षाभंग झाला. भाजपकडे माजी आमदार सुधीर पारवे, माजी जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांची नावे प्रबळ दावेदार असताना भाजपने शिवसेनेला बाहेरचा उमेदवार का दिला, यावरून अंतर्गत धुसफूस कायम आहे.

शिवसेना जिल्हा संघटक अमोल गुजर यांनी पदाचा राजीनामा पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविला; पण खासदार कृपाल तुमाने गट उघडपणे नाराजी व्यक्त करण्यात कमी पडला. पूर्व विदर्भातील भाजपने चार उमेदवार कायम ठेवले असताना ते हॅट्ट्रिकपासून वंचित राहिले. इतरांसाठी तिकीट दिले जाताना आपल्या निष्ठावंतांचे काय, असा प्रश्न आता भाजपमधूनही पुढे केला जात आहे. अर्थातच कधीकाळी देशाचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी नेतृत्व केलेल्या या 1943 गावांचा समावेश असलेल्या विस्तीर्ण मतदार संघात सर्व असंतुष्टांना कामाला लावण्याचे आव्हान शिंदे गट आणि भाजपपुढे असणार आहे. काँग्रेसचेच उमेदवार आमने-सामने उभे ठाकल्याने बर्वे यांच्या निमित्ताने माजी मंत्री सुनील केदार आणि महायुती उमेदवार म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची कसोटी या लढतीत लागणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news