नागपूर : विकास ठाकरे आज, गडकरी उद्या भरणार उमेदवारी अर्ज | पुढारी

नागपूर : विकास ठाकरे आज, गडकरी उद्या भरणार उमेदवारी अर्ज

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे आज (मंगळवार) तर भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या 27 मार्च रोजी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. संविधान चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यानंतर काँग्रेस आपले नामांकन दाखल करणार असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना कार्यकर्ते गोळा होत आहेत.

आज, उद्या नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्र माणावर नामांकन दाखल होण्याची शक्यता आहे. मविआ आणि महायुतीत बंडखोरीची शक्यता नाकारता येत नसल्याने पुढील दोन ते तीन दिवस पूर्व विदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तळ ठोकू बसणार असल्याची माहिती आहे.

विकास ठाकरे म्हणाले, कार्यकर्त्यांची मागणी होती की मी निवडणूक लढावी आणि पक्षाने माझी उमेदवारी मान्य केली. समोर नितीन गडकरी असले तरी मी ताकदीने लढवणार आणि जिंकणार आहे असा विश्वास काँग्रेसचे उमेदवार आमदार विकास ठाकरे यांनी व्यक्त केला. आजवर मिळालेल्या पदानुसार जनतेची कामे मी केली आहेत. त्यामुळे मोठा जनाधार माझ्या सोबत आहे.

लोकसभेची निवडणूक ही दोन्ही पक्षांच्या विचारधारेची निवडणूक आहे. या देशात लोकशाही राहणार की नाही यासाठी हा संघर्ष सुरु आहे. जनता लोकशाही वाचवणाऱ्या पक्षासोबत राहील हा मला विश्वास आहे. महत्वाचा मुद्दा विकास तर आहेच पण या निवडणूकीत लोकशाही संरक्षणाचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे, याकडे लक्ष वेधताना ठाकरे यांनी देशाच्या ह्रदयस्थानी होणारी ही लढत जोरदार होणार असल्याचे संकेत दिले.

हेही वाचा : 

Back to top button