Onion Export Ban | कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी; उन्हाळ कांद्याचेही निघाले दिवाळे | पुढारी

Onion Export Ban | कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी; उन्हाळ कांद्याचेही निघाले दिवाळे

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा
केंद्र सरकारने ३१ मार्चनंतरही कांदा निर्यातबंदी कायम ठेवल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. लाल कांद्याबरोबरच उन्हाळ कांदाही बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत असून, कांद्याला चांगला भाव मिळत नसल्यामुळे उत्पादन खर्चही निघतो की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

सध्या द्राक्ष हंगाम सुरू असून, लाखो रुपये खर्चूनही मागील दोन-तीन वर्षांपासून द्राक्षाला म्हणावा तसा भाव मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी द्राक्षबागा तोडुन टाकल्या. नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली. त्यातून दोन पैसे मिळतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र निवडणुका जिंकण्यासाठी मोदी सरकारने कांदा निर्यातबंदी वाढवत आशाआकांक्षांचा पालापाचोळा केला.

गेल्या वर्षी जून ते नोव्हेंबर या कालावधीत कांद्याला चांगला भाव मिळाला होता. दिवाळीनंतर कांद्याने चार हजारांचा टप्पा गाठताच मतदारांची नाराजी नको म्हणून केंद्र सरकारने दि. ८ डिसेंबर 2023 ते ३१ मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यातबंदी लागू केली. यावर्षी कांद्याला वातावरण चांगले असल्याने कांदा पीक जोमात आहे. मात्र केंद्र सरकारने निवडणुकांचे निकाल लागेपर्यंत कांदा निर्यातबंदी कायम ठेवल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

तीन दिवस सुटी
मार्चअखेर असल्याने आणि बँकेला सलग तीन दिवस सुट्या आल्याने व्यापाऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत लिलाव बंद ठेवल्यामुळे शेतकऱ्यांना आता पुढील आठवड्यातच कांदा बाजार समितीत विक्रीसाठी आणावा लागणार आहे.

वणी उपबाजारातील बाजारभाव
लाल कांदा
किमान: ८०० ₹
कमाल: १,३७५ ₹
सरासरी: १,००० ₹
उन्हाळ कांदा
किमान: १,५५१ ₹
कमाल: १,५२० ₹
सरासरी: ३०० ₹

केंद्र सरकार ३१ मार्चला कांदा निर्यातबंदी उठवेल, अशी अपेक्षा होती. मात्र ३१ मार्चनंतरही निर्यातबंदी कायम ठेवल्यामुळे शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे. लाल कांदा संपत आला असून, आता उन्हाळ कांदा बाजारात मोठ्या प्रमाणात येत आहे. कांद्याला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, पण ती धुळीस मिळाली. सर्वसामान्यांना न्याय देताना शेतकऱ्यांवर अन्याय का ? -संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

कांदालागवडीसाठी येणारा खर्च एकरी
लागवड: १२ हजार रुपये
रोप: २० ते २५ हजार रुपये
मजुरी: १० हजार रुपये
खते, तणनाशके, कीटकनाशके: १५ ते २० हजार रुपये
सरासरी खर्च: १ लाख रुपये

Back to top button