Lok Sabha Election 2024 | मराठा समाज नाशिक, दिंडोरीत देणार अपक्ष उमेदवार | पुढारी

Lok Sabha Election 2024 | मराठा समाज नाशिक, दिंडोरीत देणार अपक्ष उमेदवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी अखेर लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाची भूमिका स्पष्ट केली असून, राज्यातील जवळपास सर्वच मतदारसंघांत अपक्ष उमेदवार उभे करून प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवून देण्याचा प्रयत्न समाजाचा असणार आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातही मराठा अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभा केला जाणार असून, दिंडोरी मतदारसंघात मराठा समाजाला पाठिंबा देणाऱ्या इतर समाजाच्या उमेदवारांच्या पाठीशी मराठा समाजाची ताकद उभी केली जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाची नेमकी भूमिका काय असेल? याविषयी जरांगे-पाटील यांच्या उपस्थितीत आंतरवली सराटी येथे बैठक पार पडली. यात लोकसभा निवडणूक लढविण्यावर समाज बांधवांकडून एकमत झाले. 500हून अधिक उमेदवार उभे केल्यास, मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा प्रस्थापितांना होणार आहे. त्यामुळे समाजातूनच अपक्ष उमेदवार उभे केले जावेत, तसेच राखीव मतदारसंघात समाजाला पाठिंबा देणाऱ्या इतर समाजाच्या उमेदवाराच्या पाठीशी मराठा समाजाने उभे राहावे, असा निर्णय एकमताने घेण्यात आला. दरम्यान, या निर्णयानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाचा उमेदवार कोण असेल? याविषयी चर्चा रंगत आहे. दरम्यान, मराठा समाजाकडून चार ते पाच नावे समोर येत असून, त्यातील एका नावावर ३० मार्चपर्यंत शिक्कामोर्तब केले जाणार आहे, तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाला जो उमेदवार जाहीर पाठिंबा देणार, त्याच्या पाठीशी मराठा समाज उभा राहणार आहे.

नाशिकमधून यांची नावे चर्चेत
नाशिक लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाकडून अपक्ष उमेदवार म्हणून करण गायकर, चंद्रकांत बनकर, डॉ. सचिन देवरे, विलास पांगारकर यांची नावे पुढे आहेत. पुढील दोन दिवसांत नाशिकसह दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील मराठा समाजाची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत नावांवर एकमत झाल्यानंतर त्याबाबतचा अहवाल जरांगे-पाटील यांना सादर केला जाणार आहे.

हेही वाचा:

Back to top button