नाशिकच्या जागेवरून भाजप- शिंदेसेनेत चांगलीच जुंपली | पुढारी

नाशिकच्या जागेवरून भाजप- शिंदेसेनेत चांगलीच जुंपली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
येथील जागेवरून भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटात चांगलीच जुंपली आहे. नाशिकची जागा भाजपलाच मिळावी, यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. 18) पक्ष कार्यालयात प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांच्यासमोर ठिय्या आंदोलन करत ‘नाशिकचा खासदार कमळाचाच हवा’ अशी घोषणाबाजी केल्यानंतर शिंदे गटातूनही प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘नाशिकचा भावी खासदार हा शिवसेनेचाच असेल, असा दावा शिंदे गटाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी केला असून, उमेदवारीचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडून अधिकृतरीत्या जाहीर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

लोकसभा निवडणुकीनिमित्त नाशिकचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीच्या जागावाटपात नाशिक कळीचा मुद्दा ठरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर भाजपने नाशिकवर हक्क सांगितला असून, उत्तर प्रदेशच्या धर्तीवर नाशिकची जागा ताब्यात घेण्यासाठी भाजपने व्यूहरचना आखली आहे. जागा वाटपात नाशिक भाजपच्या पदरात पडले, अशी शक्यता कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र तथा शिंदे गटाचे युवा नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात हेमंत गोडसे यांची एकतर्फी उमेदवारी जाहीर केल्याने महायुतीत मिठाचा खडा पडला. भाजपसह राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेदेखील श्रीकांत शिंदे यांच्या या निर्णयाबाबत नापसंती व्यक्त केली. भाजपने गोडसेंच्या उमेदवारीला तीव्र विरोध करत, पक्षाकडे नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच सोमवारी रात्री (दि. १८) प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी नाशिकचा जागा भाजपलाच मिळावी, यासाठी ठिय्या आंदोलन करत थेट पक्षालाच इशारा देऊन टाकला. त्यामुळे नाशिकच्या उमेदवारीवरून भाजप विरुद्ध शिंदे गट असा सामना रंगला आहे. प्रदेश सरचिटणीस चौधरी यांनी भाजप कार्यकर्त्यांची समजूत घालत यासंदर्भातील अहवाल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीनेही या उमेदवारीवर दावा कायम ठेवल्याने नाशिकच्या जागेचा तिढा वाढला आहे.

शिंदे गटही आक्रमक
भाजपच्या या आक्रमक आंदोलनानंतर शिंदे गटानेही नाशिकची जागा कोणत्याही परिस्थितीत न सोडण्याची भूमिका घेतली आहे. शिवसेना (शिंदे गट) सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी नाशिकच्या उमेदवारीबाबत भाष्य केले आहे. नाशिकची जागा शिवसेनाच लढवणार असून, अधिकृत उमेदवाराची घोषणा मुख्यमंत्री शिंदे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

नाशिकची जागा भाजपनेच लढावी यासाठी कार्यकर्त्यांची तीव्र भावना आहे. त्यातूनच कार्यकर्त्यांनी कार्यालयात आग्रही मागणी केली आहे. त्यांच्या भावना या मी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवल्या आहेत. भाजप नेते यावर निर्णय घेतील.
– विजय चौधरी, सरचिटणीस, प्रदेश भाजप

नाशिकची जागा शिवसेना लढवणार हे निश्चित आहे. उमेदवार कोण असेल, हे शिवसेनेचे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिकृतरीत्या जाहीर करतील. भाजपचा विरोध हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. त्यावर भाजप नेत्यांनी मार्ग काढावा.
– भाऊसाहेब चौधरी, सचिव, शिवसेना शिंदे गट.

Back to top button