रायगडमध्ये तटकरेंविरुद्ध गीते होणार तिसर्‍यांदा लक्षवेधी लढत

रायगडमध्ये तटकरेंविरुद्ध गीते होणार तिसर्‍यांदा लक्षवेधी लढत

मागील दोन लोकसभा निवडणुकीत एकमेकाला पराभूत करून विजयी झालेले गीते व तटकरे यांच्यात आता 2024 ला तिसर्‍यांदा लक्षवेधी लढत होत आहे. 2014 मध्ये अनंत गीतेंनी सुनील तटकरेेंना अवघ्या 2000 मतांनी पराभूत केले होते. मात्र या पराभवाचा वचपा काढत 2019 मध्ये सुनील तटकरे यांनी केंद्रीय मंत्रिपदावर असलेल्या अनंत गीते यांचा 25000 मताधिक्याने पराभव केला होता. या तटकरेंच्या विजयात रायगडमध्ये पाय रोवून असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचा मोठा वाटा होता. आता कालपरत्वे राजकीय स्थिती बदलली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार महायुतीत आले आहेत; तर महायुतीचे उमेदवार महाविकास आघाडीत आले आहेत. ही किमया सध्याच्या बदललेल्या राजकीय समीकरणांचा परिपाक आहे.

राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर याचा सर्वाधिक परिणाम रायगड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. मागच्या निवडणुकीत ज्या शेतकरी कामगार पक्षाने अनंत गीतेंना पराभूत केले, तोच शेतकरी कामगार पक्ष आज 2024 मध्ये अनंत गीतेंच्या विजयासाठी कंबर कसून उभा आहे. सुनील तटकरे किंवा आदिती तटकरे या रायगड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार असणार आहेत; तर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अनंत गीते यांनी गेल्या महिनाभरापासून प्रचार सुरू केला आहे. रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे 2019 ला विजयी झालेले तिन्ही आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोंबत आहेत. त्यांनी शिवसेना सोडण्याचे कारण तटकरेंच्या कार्यपद्धतीचे दिले होते. मात्र आता शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनीच सुनील तटकरे लोकसभेला हवे म्हणून मागणी लावून धरली आहे. हा काळाचा महिमा आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, श्रीवर्धन आणि महाड असे चार विधानसभा मतदारसंघ तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि गुहागर असे दोन विधानसभा मतदारसंघ येतात. या मतदारसंघात एकूण 16 लाख मतदार आहेत. सद्य:स्थितीत महायुतीकडे पाच आमदार आहेत. महाविकास आघाडीकडे एक आमदार आहे. मात्र शिवसेना आमदार महायुतीत असले तरी मतदार कुणाकडे याचा फैसला झालेला नाही. शिवसेनेचे मतदारांचे क्रेडर ठाकरेंसोबत येणार की शिंदेेंसोबत याबाबत विजयाचे गणित ठरणार आहे.

तीन आमदार गेल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने महाडमधून स्नेहल जगताप, दापोलीमध्ये संजय कदम अशा युवा चेहर्‍यांना आपल्या पक्षात आणून पक्षाची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँगे्रस विरुद्ध भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी असा हा तोडीस तोड सामना या मतदारसंघात पाहायला मिळणार आहे. सुनील तटकरेंच्या उमेदवारीसाठी आमदारांचा पुढाकार आहे. रायगडची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार असल्याने सुनील तटकरे यांनी विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतल्यास राज्यात कॅबिनेट मंत्री असलेल्या आदिती तटकरे या महायुतीच्या उमेदवार असू शकतील. मात्र कोणीही रिंगणात उतरले तरी तटकरे विरुद्ध गीते हाच सामना होणार आहे.

या मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाची 50 ते 60 हजार मते आहेत. मात्र भाजपने शेकापचे पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांना आपल्या पक्षात घेऊन शेकापची व्होट बँक दुभंगण्याच्या प्रक्रियेला गती दिली आहे. मात्र धैर्यशील पाटील हे लोकसभेच्या उमेदवारीसाठी भाजपत गेले होते. आता लोकसभा तटकरेंना मिळणार असेल तर आपले राजकीय भवितव्य काय, याबाबतही धैर्यशील पाटील विचार करू शकतात. त्यामुुळे पुढच्या राजकीय घडामोडीवर मतदारसंघातील जय-पराजयाचे गणित निश्चित होऊ शकते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news