भाजपकडून उत्तर महाराष्ट्रात कुणाला संधी? कुणाचा पत्ता कट? पाहा यादी…. | पुढारी

भाजपकडून उत्तर महाराष्ट्रात कुणाला संधी? कुणाचा पत्ता कट? पाहा यादी....

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी यादी जाहीर केली असून दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार तथा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. धुळ्यातून सुभाष भामरे यांचीही उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे. तर, जळगावातून विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापण्यात आले असून, माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे.

भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकही उमेदवार घोषित करण्यात आला नव्हता. त्यामुळे भाजपच्या दुसऱ्या यादीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. बुधवारी सायंकाळी भाजपकडून लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा समावेश आहे. दिंडोरी मतदारसंघातून पुन्हा एकदा डॉ. पवार यांना उमेदवारी देत भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखविला आहे. धुळे मतदारसंघातून सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भामरे यांच्या उमेदवारीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरु होती. त्यांचे तिकीट कापले जाईल, अशी चर्चा सुरु होती. पण पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा संधी दिली आहे.

जळगाव मतदारसंघात भाजपने धक्कातंत्रचा अवलंब केला आहे. जळगावात भाजपने विद्यामान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापले आहे. या ऐवजी माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. स्मिता वाघ भाजपच्या विधान परिषदेच्यादेखील आमदार होत्या. तसेच ते भाजपचे दिवंगत नेते उदय वाघ यांच्या पत्नी आहेत. नंदुरबारमधून हिना गावित यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. हिना गावित या सध्या तिथल्या खासदार आहेत. त्या गेल्या १० वर्षांपासून नंदुरबारच्या खासदार आहेत. त्यामुळे त्यांना यावेळी विजयाची हॅटट्रिक करण्याची संधी पक्षाने दिली आहे. यादीत भाजप नेत्या पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, रक्षा खडसे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूरमधून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. नितीन गडकरी यांना नागपूरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बीडमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. रावेरमधून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

Back to top button