नांदेड : पोलीस महिलेच्या लिंग परिवर्तनाला गृहविभागाची परवानगी; मराठवाड्यातील दुसरी घटना | पुढारी

नांदेड : पोलीस महिलेच्या लिंग परिवर्तनाला गृहविभागाची परवानगी; मराठवाड्यातील दुसरी घटना

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नांदेड पोलीस दलातील एका महिला पोलीस नाईकला लिंग परिवर्तनासाठी शासनाच्या गृहविभागाने परवागी दिली आहे. यापूर्वी बीड पोलीस दलातील एका महिला पोलीस कर्मचा-याला लिंग परिवर्तनाची परवागी देण्यात आली होती. त्यामुळे मराठवाड्यात पोलीस दलातील हे दुसरे परिवर्तन आहे. हदगाव तालुक्यातील एका पोलीस ठाण्यातील संबंधीत महिला पोलीस नाईकवर लवकरच लिंग परिवर्तनाची शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

याबाबत संबंधित महिला पोलीस नाईक कर्मचारीने दिलेल्या माहितीनुसार, मागील दिड वर्षापासून त्यांनी शासनाच्या गृह विभागाकडे लिंग परिवर्तनाच्या परवानगीसाठी प्रस्ताव दाखल केला होता. त्या २००५ मध्ये अनुकंपातत्वावर पोलीस दलात रूजू झाल्या होत्या. लहानपणापासूनच त्या मुलांसोबत खेळत होत्या. त्यांचे रहाणीमानही पुरूषांसारखे असल्याची त्यांनी सांगितले आहे. वयात आल्यानंतर त्यांना स्वत:मधील बदल लक्षात आले. दरम्यान, वडिलांच्या निधनानंतर कुटूंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली होती.

आई, दोन बहिनी व भाऊ असे त्यांचे कुटूंब असून आता एका बहिणीचे लग्न करून दिले आहे. या जबाबदारीमुळे व कोण काय म्हणले या विचारातच त्यांना लिंग परिवर्तनाचा निर्णय घेणे अवघड होत होते. श‍िवाय कुटूंबियांचाही सुरवातीला विरोध होता. शेवटी अपल्यातील ही घुसमट त्यांनी तृतीयपंथी कार्यकर्ता डॉ. सान्वी जेठवाणी यांच्याकडे व्यक्त केली. त्यांच्या सहकार्यातून गृहविभागाकडे याबाबत परवानगी मागीतली होती. अखेर ११ जानेवारी रोजी त्यांना लिंग बदल शस्त्रक्रियेस तसेच नाव बदल करण्यास हरकत नाही, असा अभिप्राय दिला आहे. याशिवाय सदर शस्त्रक्रियासाठी येणारा खर्च संबंधित महिला पोलीस यांनी स्वत: करणे आवश्यक आहे, असे गृहविभागाच्या कक्ष अधिकारी योगिता मालप यांनी पत्रद्वारे सांगितले असल्याचे संबंधीत महिला पोलीस नाईक यांनी सांगितले आहे.

हेही वाचा

Back to top button