देशातील मनमानी कारभाराविरोधात कार्यकर्त्यांनी एकत्र होऊन संघर्ष करण्याची वेळ : शरद पवार | पुढारी

देशातील मनमानी कारभाराविरोधात कार्यकर्त्यांनी एकत्र होऊन संघर्ष करण्याची वेळ : शरद पवार

धुळे : पुढारी वृत्तसेवा – देशात आज हुकूमशाही पद्धतीचा कारभार केला जात आहे. पूर्वी नेते पक्ष सोडून जात होते. पण आता मनमानी पद्धतीने लोकशाही तुडवत एकाचा पक्ष दुसऱ्याला दिला जात आहे. देशाची परिस्थिती बघता सर्व कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन संघर्ष केला पाहिजे, असे प्रतिपादन खासदार शरद पवार यांनी धुळ्यातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले.

धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( शरदचंद्र पवार) पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले यांनी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा बारामती पाहणी दौरा आयोजित केला. यावेळी कार्यकर्त्यांना पक्षाचे नेते तथा खासदार शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. या कार्यकर्त्यांनी बारामती परिसरातील शेती आणि संस्थांच्या विकासाची पाहणी करून बैठकीत अनुभव कथन केले.

पक्षातील बंडोखरी नंतर सुद्धा पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या निष्ठेने शरद पवार यांच्या विचाराने काम करीत आहेत. शरद पवार यांचे विचार, बारामती मधील त्यांचे काम हे सर्वांसाठी स्फूर्तीदायक आहेत. हाच विचार करून रणजीत भोसले यांनी पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बारामती पाहणी दौरा आयोजित केला होता. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर बिझी कार्यक्रम असताना देखील शरद पवार यांनी धुळे जिल्ह्यातील सर्वांना एक ते दीड तासाचा वेळ दिला.

बारामती लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची गर्दी असताना शरद पवार यांनी धुळ्यातील कार्यकर्त्यांशी हितगुज साधले. धुळ्यातील कार्यकर्त्यांची भेट शरद पवार यांनी बारामती येथील “गोविंद बाग” या निवासस्थानी घेतली. शरद पवारांनी धुळ्यातील कार्यकर्त्यांना त्यांचे मनोगत मांडण्यास सांगून त्यांची भावना जाणून घेतली.

यावेळी नंदू येलमामे, दीपक देवरे, अमित शेख, दीपक बैसाने, संदीप पाटील, कल्पेश मगर, दिलीप पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यकर्त्यांनी धुळ्याची परिस्थिती व पक्षाचे काम यांची मांडणी केली. रणजीत भोसले यांनी सांगितले की, येथे आलेले कार्यकर्ते हे विविध जाती-धर्माचे, विविध क्षेत्राचे तसेच विविध परिसरातून आलेले आहेत. हे सर्व कार्यकर्ते शिव -फुले- शाहू- आंबेडकर विचारधारेवर चालणारे आहेत. तसेच आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहेत.

‘देशात हुकूमशाही कारभार’

शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. शरद पवार म्हणाले की, देशात आज हुकूमशाही पद्धतीचे कारभार केला जात आहे. पूर्वी नेते पक्ष सोडून जात होते. पण आता मनमानी पद्धतीने लोकशाही तुडवत एकाचा पक्ष दुसऱ्याला दिला जात आहे. देशाची परिस्थिती बघता सर्व कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन संघर्ष केला पाहिजे. सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून त्यांना सर्व गोष्टी अवगत करणे गरजेचे आहे. हुकूमशाही, दडपशाही जास्त दिवस टिकणार नाही. जोमाने कामाला लागा. पुढील दिवस आपले आहेत. शहराचे अध्यक्ष व तुमचे काम चांगले आहे. लोकांमध्ये जाऊन आपले विचार मांडा असे शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.

विशेषत: शरद पवार यांनी धुळ्यातील कार्यकर्त्यांना बारामती व तेथील कामे बघण्यासाठी स्वतः फोन लावून काही लोकांना जबाबदारी दिली. धुळ्यातील कार्यकर्त्यांनी रणजीत भोसले सह बारामती येथील प्रगतशील, अद्यावत तंत्रज्ञानसह केली जाणारी शेती पाहिली. बारामती मधील कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली. तेथील फळबागा, फुल, मच्छशेती, शेततळे, प्रयोगशाळा, शेतकरी निवासस्थान आदींची पाहणी केली. बारामती येथील जागतिक पातळीची डेअरी फॉर्मला भेट दिली. डेअरी फॉर्म येथील विविध जातीच्या गाई म्हशी, नवीन तंत्रज्ञान, जनावरांचे आरोग्य तपासणी टेक्नॉलॉजी, देशातील प्रसिद्ध लॅब याची पाहणी करून तेथील अधिकाऱ्याने संपूर्ण माहिती कार्यकर्त्यांना दिली.

बारामती शहरातील कृषी महाविद्यालय, इनोव्हेशन सेंटर, आधुनिक हॉल यांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी तेथील अधिकाऱ्यांनी ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मार्फत १९७१ ते २०२३ पर्यंत केल्या गेलेल्या विविध कामांची माहिती एका डॉक्युमेंटरी फिल्मच्या माध्यमातून दाखवून दिली. शरद पवार यांना १९६८ साली केलेल्या फूड फॉर अंगर कामाची माहिती यावेळी देण्यात आली.

धुळ्यातील कार्यकर्त्यांनी बारामती येथील प्रसिद्ध विद्या विकास प्रतिष्ठानच्या कॅम्पसला भेट दिली. एकाच ठिकाणी शेकडो एकरवर “केजी टू पीजी” शिक्षणाचे आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. विविध राज्यातील हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. शरदचंद्र पवार यांच्या जीवनावर आधारित संग्रहालयाची पाहणी सर्व पदाधिकाऱ्यांनी केली. या संग्रहालयामध्ये शरद पवार यांच्या जीवनावर आधारित विविध घडामोडी, जगभरातील भेटवस्तू, जागतिक नेत्यांच्या भेटीगाठी, जुने वर्तमानपत्रे, विविध फोटोग्राफ, जुन्या आठवणी, महत्त्वाचे प्रसंग आदी माहिती दाखवण्यात आलेली आहे.

या दौऱ्यामध्ये गोरख शर्मा, अमित शेख, अशोक धुळकर, राजू डॉमेड, डी टी पाटील, नंदू येलममे, शशी काटे, आसिफ शेख, बरकत शाह, भाग्येश मोरे, भटू पाटील, भिका नेरकर, भूषण पाटील, दत्तू पाटील आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कौतुक आणि जेवणाचे आमंत्रण

धुळ्यातून आलेल्या कार्यकर्त्यांचे शरद पवारांनी कौतुक केले. काही स्थानिक मंडळी गर्दी करीत असताना साहेबांनी त्यांना रोखले आणि म्हणाले की, ४०० किलोमीटर वरून धुळेकर आलेले आहेत. त्यांना पहिले वेळ देऊ. त्यानंतर पवार यांनी धुळेकरांना जेवणाचे आमंत्रण दिले. सर्व कार्यकर्त्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली.

Back to top button