मनोज जरांगेंची सर्व आंदोलने स्थगित | पुढारी

मनोज जरांगेंची सर्व आंदोलने स्थगित

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : मनोज जरांगे- पाटील यांनी पुढील सर्व आंदोलन स्थगित करण्याची आज (दि.२८) घोषणा केली. वृद्धांचे आमरण उपोषण व जिल्ह्याच्या ठिकाणी होणारा रास्ता रोको ही सर्व आंदोलने स्थगित करण्यात आली आहेत. परीक्षेचा कालावधी व धार्मिक कार्यक्रमांच्या अनुषंगाने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे मनोज जरांगे- पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मनोज जरांगे- पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे सुरू असलेले तिसऱ्या टप्प्यातील अमरण उपोषण सोमवार (दि.२६) रोजी १७ व्या दिवशी सुटले. त्यानंतर ते उपचार घेण्यासाठी रूग्णालयात दाखल झाले. त्यांनी मागील काही दिवसापूर्वी समाज बांधवांची बैठक घेऊन यामध्ये २४ ते २९ फेब्रुवारीपर्यंत गावात साखळी उपोषण तर १ मार्च रोजी अंतरवालीत वृद्धांचे आमरण उपोषण आंदोलन होणार असल्याचे जाहीर केले होते. याच वृद्धांच्या आमरण उपोषणाला भेट देण्यासाठी राज्यातील सर्व आजी- माजी आमदार, खासदार, मंत्री , मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वांनी बैठकीसाठी यावे, असे आव्हान देखील मनोज जरांगे यांनी केले होते. तसेच ३ मार्चला प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन करण्याचेही मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले होते. मात्र ही सर्व आंदोलने रद्द केल्याची घोषणा त्यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

विद्यार्थ्यांसाठी आमची सर्व आंदोलने स्थगित केली आहेत. विद्यार्थी आणि काही सामाजिक कार्यक्रम असल्याने आम्ही जाहीर केलेली सर्व आंदोलने रद्द केली आहेत. आमची लढाई हटलेली, थांबलेली नाही. लढाई सुरूच आहे.

-मनोज जरांगे,मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते

Back to top button