महाड : भरदिवसा अडीच लाखांची चोरी, पाच घरे फोडली | पुढारी

महाड : भरदिवसा अडीच लाखांची चोरी, पाच घरे फोडली

महाड ः पुढारी वृत्तसेवा :  महाडमध्ये घरफोड्यांचे सत्र सुरुच असुन चोरट्यांनी भरदिवसा पाच घरे फोडल्याने शहरात खळबळ माजली आहे.

संबंधित बातम्या 

महाड शहर पोलीस ठाण्यापासून काही मिटर अंतरावर असणार्‍या गवळ आळी परिसरामध्ये आज भरदिवसा दुपारच्या वेळेला घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी अडीच लाखांचा ऐवज लंपास केला आहे. गेले काही दिवसांमध्ये शहरात चोरांनी धुमाकूळ घातला असुन पोलीस प्रशासनाला चोरट्यांना पकडण्यात अपयश येत असल्याने या प्रकारात वाढ होत आहे.

यापूर्वी एका व्यापार्‍यांच्या घरी 50 लाखांची चोरी झाली होती.त्यानंतर प्रभात कॉलनीत पाच लाख रुपयांचा ऐवज लुटला गेला.अजुनही महाडमध्ये मोठ्या प्रमाणावर घरफोडीचे सत्र सुरु आहे. त्यातच आता तर आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पोलिसांना न घाबरता शहरातील मध्यवर्ती वस्तीतील गवळ आळी परिसरामध्ये असलेल्या वामन स्मृती बिल्डिंगमध्ये दुसर्‍या मजल्यावर घरफोडी करण्यात आली.

गवळ आळी मधील वामन स्मृती इमारतीमध्ये राहणार्‍या दुसर्‍या मजल्या वरील सिद्धेश दत्तात्रय दिघे यांच्या घरी कोणी नसल्याचे पाहून दुपारी अडीचच्या सुमारास बाजूच्या रहिवाशांच्या घराला बाहेरून कड्या लावण्यात आल्या. ,तसेच दरवाज्या वरील इतर रहिवाशांच्या आय होलला बाहेरून स्टिकर लावले आणि दिघे यांच्या घराच्या दरवाजातील लॉक तोडून चोरट्यांनी घरातील अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले.

याबाबत सिद्धेश दिघे यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली असून महाड शहर पोलीस घटनेचा तपास करत आहे. त्याच बरोबरशहरातील काजळपुरा या ठिकाणी अमर पॅलेस या बिल्डिंग मध्ये दुसर्‍या मजल्यावर नंदकुमार जगन्नाथ जाधव यांचा बंद फ्लॅट चोरांनी आज तोडून घरात प्रवेश करत चोरीचा प्रयत्न केला.शहराच पाच ठिकाणी असा प्रयत्न करण्यात आला आहे. महाड शहरामध्ये चोरीच्या घटना वाढत असतानाच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिस प्रशासन सिसिटिव्ही बसवण्याची जबाबदारी घरमालकावर टाकून आपली जबाबदारी झटकत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. आत्ता पर्यंत झालेल्या घरफोड्यांतील चोरट्यांचा तपास करण्यात पोलीस यंत्रणेला अपयश आल्याने चोरीच्या घटना वाढत आहेत.

Back to top button