पिंपळनेर : ग्रामसेवकाने केला शालकाचा खून, नंतर स्वत:च आला पोलिसांना शरण | पुढारी

पिंपळनेर : ग्रामसेवकाने केला शालकाचा खून, नंतर स्वत:च आला पोलिसांना शरण

पिंपळनेर, जि.धुळे : पुढारी वृत्तसेवा
साक्री तालुक्यातील शेंदवड येथे कौटुंबिक कारणातून ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुनील चौरे यांनी शालक चंदू गायकवाड याचा गळा आवळून खून केल्याची घटना साक्री तालुक्यातील शेंदवड गावात घडली. त्यानंतर संशयित सुनील चौरे स्वतः पिंपळनेर पोलिस ठाण्यात शरण आला आहे. या घटनेबद्दल रविवारी (दि.२५) पहाटे साडेसहा वाजता पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पिंपळनेर येथील हरिओम नगरातील रहिवासी सुनील धुडकू चौरे (वय 36) हे ग्रामसेवक असून पिंपळनेरपासून सुमारे 25 किमी अंतरावर असलेल्या शेंदवड गावातील ते रहिवासी आहे. शनिवारी (दि.२४) काैटुंबिक वादावरुन त्यांचा पत्नी रेखा हीच्यासोबत शाब्दिक वाद झाले. त्यानंतर सुनील चौरे हे शेंदवड गावात निघून आले. या दामत्यामध्ये झालेल्या वादात रेखा यांचा भाऊ चंदू सखाराम गायकवाड (वय 27) याने मध्यस्थी करत सुनील चौरे यास शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली. या मारहाणीमध्ये सुनील चौरे यांनी चंदू याचा गळा आवळला. शनिवारी (दि.२४) रात्री साडेनऊच्या सुमारास रेश्मा गायकवाड यांच्या अंगणात हा प्रकार घडला. घटनेनंतर सुनील चौरे स्वत: पिंपळनेर पोलिस ठाण्यात हजर होऊन झालेला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी शेंदवड गाव गाठून चंदूला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चंदू यास मृत घोषित केले. मृत चंदूचा मोठा भाऊ अशोक सखाराम गायकवाड (वय 29) याच्या तक्रारीवरुन सुनील चौरे विरोधात पिंपळनेर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला  आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भूषण शेवाळे करीत आहेत. शवविच्छेदनानंतर चंदूवर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत चंदूचा शेती व्यवसाय असून त्याच्या पश्चात पत्नी व तीन मुले आहेत.  संशयित सुनीलला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

खरे-खोटे करण्याच्या प्रयत्नात झाला खून
शेंदवड गावातील एका यात्रेत सुनील चौरे हा एका मुलीसोबत फिरत होता. या संशयावरुन चंदू आणि बहिण रेखा यांच्यात चर्चा झाली. या चर्चेनंतर पत्नी रेखा व सुनील चौरे दाम्पत्यात वाद झाला. त्यामुळे खरे-खोटे करण्यासाठी सुनील शेंदवड गावात आल्यानंतर चंदूसोबत झालेल्या भांडणाचे पर्यावसन मारहाणीत होऊन चंदूचा अंत झाला.

घटनेनंतर संशयित, शेजारी व कुटुंबीयांकडे चौकशी केली. इतरांचे जबाब घेतले जाणार आहेत. गावात शांतता  बाळगली जात आहे. –  जयेश खैरनार, सहायक पोलीस निरीक्षक, पिंपळनेर.

Back to top button