NMC News | मागासवर्गीयांना उच्च शिक्षणासाठी मनपा देणार शिष्यवृत्ती | पुढारी

NMC News | मागासवर्गीयांना उच्च शिक्षणासाठी मनपा देणार शिष्यवृत्ती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती या दुर्बल घटकांकरीता विविध कल्याणकारी योजनांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना (Scholarship Scheme for Higher Education) सुरू करण्याचा निर्णय नाशिक महापालिकेने घेतला आहे. यासाठी महापालिकेच्या २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. मागासवर्गीयांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमही (Skill Development Programme) राबविला जाणार आहे.

महापालिकेच्या समाजकल्याण विभागामार्फत मागासवर्गीय तसेच महिला व दिव्यांग कल्याणासाठी विविध योजना राबविल्या जातात. यासाठी मागासवर्गीय कल्याणकारी योजना, महिला व बालकल्याण, दिव्यांग कल्याण तसेच क्रीडा धोरणासाठी अंदाजपत्रकात प्रत्येकी पाच टक्के निधी राखीव ठेवला जातो. मागासवर्गीय कल्याणकारी योजनांतर्गत यावर्षीपासून मागासवर्गीय युवक व युवतींना उच्च शिक्षणासाठी अर्थात वैद्यकीय, अभियांत्रिकी आदी क्षेत्रातील पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना राबविली जाणार आहे. महापालिका हद्दीत राहणाऱ्या मागासवर्गीयांसाठीच ही योजना असणार आहे. मागासवर्गीयांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षणही दिले जाणार आहे. यासाठी देखील अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आल्याची माहिती समाजकल्याण विभागाचे उपायुक्त प्रशांत पाटील यांनी दिली. (Scholarship Scheme for Higher Education)

महिलांसाठी अर्थसाहाय्य योजना
महिला व बालकल्याणासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या पाच टक्के निधीतून घटस्फोटीत, विधवा, परित्यक्ता महिला तसेच त्यांच्या मुलांकरीता विविध चार कल्याणकारी योजना (welfare scheme) राबविल्या जात आहेत. चालु आर्थिक वर्षात २९५ महिलांना या योजनांचा लाभ देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शहरातील महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी प्रथमच अर्थसाहाय्य योजना राबविली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे.

दिव्यांगांसाठी विशेष उद्यान
महापालिका हद्दीतील दिव्यांगांसाठी विविध १२ कल्याणकारी योजनांची (welfare scheme) अंमलबजावणी केली जात आहे. विविध योजनांद्वारे आतापर्यंत २५६० दिव्यांगा लाभ देण्यात आला आहे. बेरोजगार दिव्यांग अर्थसहाय्य योजना व मतीमंद, बहुविकलांग दिव्यंगा अर्थसहाय्य योजनेअंतर्गत दरमहा अर्थसहाय्य लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जात आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात दिव्यांगांसाठी स्वतंत्र विशेष उद्यान उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे.

हेही वाचा:

Back to top button