बरोबर प्रपंच करणार असाल, तर तो समाधानाने करा :आ. मोहिते पाटील | पुढारी

बरोबर प्रपंच करणार असाल, तर तो समाधानाने करा :आ. मोहिते पाटील

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा :  आमच्याबरोबर प्रपंच करणार आहात; मग समाधानाने करा, असा इशारा खेड-आळंदीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी शिवसेनेचे उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना दिला आहे. मी केलेल्या विकासकामांवर त्याच स्वरूपाचे दुसरे काम मंजूर करून आढळराव पाटील नेमके काय साध्य करू इच्छितात? ते एकदा त्यांनी सांगावे. आम्हाला एकमेकांविरोधात लढायचे नाही; मग श्रेयवाद कशाला? असा प्रश्न आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी उपस्थित केला.
राजगुरुनगर येथे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या माध्यमातून मंजूर 1 कोटी 6 लाख 22 हजार रुपयांच्या कामाचे भूमिपूजन मंगळवारी (दि 13) आ. मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी आयोजित स्वागत समारंभात ते बोलत होते. भूमिपूजन झालेल्या ठिकाणी आढळराव पाटील यांच्या माध्यमातून आणखी एक शेड मंजूर करण्यात आल्याची माहिती निवेदकाने दिल्यावर मोहिते पाटील यांनी वरीलप्रमाणे आढळराव पाटील यांना टोला लगावला.
जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाचे माजी सभापती अरुण चांभारे, माजी सदस्या मंगल चांभारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, बाजार समितीचे सभापती कैलास लिंभोरे, संचालक अशोक राक्षे, माजी सभापती विनायक घुमटकर, बाळासाहेब सांडभोर, राजगुरुनगर शहराध्यक्ष सुभाष होले, राजगुरुनगर सहकारी बँकेचे संचालक गणेश थिगळे, विलास मांजरे, आशा तांबे, अ‍ॅड. मनीषा टाकळकर, सागर सातकर, जयसिंग दरेकर, राजगुरुनगर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, संतोष भांगे, नगरसेवक किशोर ओसवाल, निवेदक विशाल शिंदे, अमर टाटीया, मनीषा सांडभोर आदी मान्यवर आणि ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते. वैभव घुमटकर यांनी प्रास्ताविक केले. कैलास दुधाळे यांनी सूत्रसंचालन केले.

शिरूर लोकसभा मतदारसंघातून सत्तेतील महायुतीचा उमेदवार कोण? हे अद्याप गुलदस्तात आहे. शिरूरची जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला जाऊ शकते, असे झाल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संमतीने आढळराव पाटील यांची राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी वर्णी लागू शकते.

अजित पवार यांचे राष्ट्रवादीचे पहिल्या फळीतले नेते माजी मंत्री आणि आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील आणि आढळराव पाटील अशा दोघांच्या उपस्थितीत जाहीर कार्यक्रम होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर खेडचे आमदार मोहिते पाटील यांच्याबरोबर मात्र आढळराव पाटील यांचे सूत अद्याप जुळलेले नाही. निवडणुका जवळ आल्या तरी मोहिते पाटील यांच्याकडून आढळराव पाटील यांच्याविरोधात पहिल्याप्रमाणे टीकाटिप्पणी केली जात आहे, याबाबत आढळराव पाटील यांनी प्रतिक्रिया देण्यास
नकार दिला.

Back to top button