नाशिक, पुढारी वृत्तसेवा : माजी खासदार संभाजीराजे नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र, ओबीसी नेते छगन भुजबळ नाशिक लोकसभेच्या मैदानात उतरणार असतील, तरच त्यांच्या विरोधात संभाजीराजे शड्डू ठोकणार असल्याची माहिती 'स्वराज्य'च्या पदाधिकार्यांकडून दिली जात आहे.
गेल्या काही महिन्यांतील संभाजीराजेंचे नाशिक दौरे लक्षात घेता ते नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा होती. त्यातच त्यांनी गतवर्षी कोल्हापूर सोडून प्रथमच नाशिकमध्ये सहपरिवार आपला वाढदिवस साजरा केल्याने या चर्चेला बळकटी मिळाली होती. मात्र, नाशिकमधील प्रमुख पदाधिकार्यांनी त्यांची साथ सोडल्याने त्यांचे नाव मागे पडले होते.
आता पुन्हा एकदा त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. भुजबळांविरोधात ते निवडणुकीच्या मैदानात उभे राहण्याची तयारी करीत असल्याचे बोलले जात आहे. भुजबळांकडून सातत्याने ओबीसीच्या कोट्यातून दिल्या जाणार्या मराठा आरक्षणाला विरोध दर्शविला जात असल्याने मराठा समाज त्यांच्या विरोधात असल्याचे वातावरण आहे. याच कारणामुळे संभाजीराजे भुजबळांविरोधात रिंगणात उभे राहणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, येत्या 11 रोजी संभाजीराजे यांचा वाढदिवस असून त्या दिवशी लोकसभा निवडणूक कोणत्या पक्षाकडून अन् कोणत्या मतदारसंघात लढविणार असल्याची घोषणा त्यांच्याकडून केली जाण्याची शक्यता आहे. नाशिक, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगरमधून ते निवडणूक लढविण्यास उत्सुक असल्याचे स्वराज्य पदाधिकार्यांकडून सांगितले जाते.