राजगडावरील विक्रेत्यांपुढे पुरातत्व विभाग हतबल | पुढारी

राजगडावरील विक्रेत्यांपुढे पुरातत्व विभाग हतबल

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा :  राजगड किल्ल्यावर मनाई असतानाही तसेच खाद्यपदार्थ विक्री करणार्‍या विक्रेत्यांवर कारवाई करूनही विक्रेते गडावर ठाण मांडून आहेत. गडावरील ऐतिहासिक वास्तूंच्या परिसरात खाद्यपदार्थ विक्री करीत आहेत. त्यामुळे या विक्रेत्यांपुढे पुरातत्व खाते हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राजगड किल्ल्यावर रविवारी सुटीच्या दिवशी मोठ्या संख्येने पर्यटक गर्दी करतात. धोकादायक तटबंदी, बुरुजावर जाणार्‍या पर्यटकांना रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या पाहरेकर्‍यांना धावपळ करावी लागते. असे असताना दुसरीकडे खाद्यपदार्थ विक्रेते विनवण्यांना न जुमानता गडावर ठाण मांडून खाद्यपदार्थ विक्री करत आहेत. त्यामुळे पुरातत्व खाते हतबल झाले आहे.

दरम्यान, राजगड किल्ल्याच्या पाल खुर्द राजमार्ग तसेच संजीवनी माची, पद्मावती माची परिसरातील तटबंदी, बुरुजाखाली प्लॅस्टिकच्या पिशव्या, बाटल्यांसह कचर्‍याचे ढीग पडले आहेत. त्यामुळे वनसंपदेसह गडाच्या सौंदर्याला बाधा पोहोचत आहे. गडावर खाद्यपदार्थ शिजवून विक्रीला मनाई करण्याच्या आदेशाकडे विक्रेते दुर्लक्ष करीत असल्याचे यावरुन उजेडात आले आहे. दरम्यान, स्थानिक विक्रेत्यांना गडावर खाद्यपदार्थ विक्रीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

पुरातत्व विभाग पोलिसांत तक्रार देणार
या पूर्वी पुरातत्व विभागाचे सहसंचालक डॉ. विलास वाहणे यांनी केलेल्या तक्रारीवरून वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रणजित पठारे यांच्या पथकाने दहा विक्रेत्यांवर कारवाई केली होती. मात्र, तरीही खाद्यपदार्थ विक्रेते गडावर ठाण मांडून आहेत. याबाबत पुरातत्व विभागाचे पहारेकरी बापु साबळे म्हणाले, विनवण्या करूनही विक्रेते जुमानत नाहीत. त्यामुळे वेल्हे पोलिस ठाण्यात पुन्हा तक्रार दाखल केली जाणार आहे.

Back to top button