Nashik | लोकसभा निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांची जुळवाजुळव; जिल्हा प्रशासनाच्या तयारीला वेग | पुढारी

Nashik | लोकसभा निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांची जुळवाजुळव; जिल्हा प्रशासनाच्या तयारीला वेग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी मतदारसंघांसाठी सुमारे ४० हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. त्या दृष्टीने निवडणूक शाखेकडून कर्मचाऱ्यांची जुळवाजुळव केली जात आहे. कर्मचाऱ्यांना निवडणूक कामाच्या नियुक्तीचे आदेश देण्यास प्रारंभ झाला आहे.

फेब्रुवारीअखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजू शकतो. त्यादृष्टीने राजकीय पक्षांकडून रणनीती आखली जात आहे. दुसरीकडे लोकसभेसाठी प्रशासकीय स्तरावरही तयारीला वेग आला आहे. जिल्ह्यात लोकसभेचे नाशिक व दिंडोरी असे दोन मतदारसंघ आहेत. या दोन्ही मतदारसंघांत निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचारीवर्ग लागणार आहे. त्यामुळे निवडणूक शाखेने विविध आस्थापनांकडून यापूर्वीच कर्मचाऱ्यांची माहिती गोळा केली आहे.

लोकसभेचे नाशिक व दिंडोरी असे दोन्ही मतदासंघ जिल्ह्यात चार हजार ७३९ मतदान केंद्रे आहेत. मतदार केंद्रांची संख्या आणि आयोगाच्या मार्गदर्शनानुसार राखीव १० टक्क्यांचा कोटा लक्षात घेता साधारणत: ४० हजारांच्या आसपास कर्मचारी निवडणुकीसाठी लागणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर निवडणूक शाखेकडून महसूल, महापालिका, जिल्हा परिषदेसोबतच अन्य शासकीय विभाग तसेच खासगी शाळा-महाविद्यालयांचे कर्मचारी निवडणूक कामासाठी नियुक्त केले जाणार आहेत.

येत्या दोन ते तीन आठवड्यांत कोणत्याही क्षणी निवडणुकांची घोषणा होऊ शकते. निवडणूक शाखेने हीच शक्यता गृहीत धरून कर्मचाऱ्यांना आतापासूनच नियुक्ती आदेश प्रदान करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे कर्मचारीदेखील आर्श्चयचकीत झाले आहेत.

महिनाअखेरपासून प्रशिक्षण
लोकसभा निवडणुकीसाठीचा कालावधी अवघ्या काही दिवसांवर ठेपला आहे. त्यातच जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांचा व्याप बघता निवडणूक शाखेकडून त्यांच्या स्तरावर सर्वप्रथम अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. तसेच प्रत्यक्ष निवडणुकीसाठी नियुक्त केल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे महिनाअखेरपासून प्रशिक्षण वर्ग घेतले जाऊ शकतात. या प्रशिक्षणामध्ये ईव्हीएम हाताळणी, मतदान केंद्रावरील तयारी, मतदानाशी निगडित बाबींचा समावेश आहे.

लोकसभा दृष्टिक्षेपात
– जिल्ह्यात ४७ लाख ४८ हजार १५३ मतदार
– मतदान केंद्रांची एकूण संख्या ४ हजार ७३९
– दीड लाखाच्या वर दिव्यांग, ८० वर्षावरील मतदार
– नाशिक पश्चिममध्ये सर्वाधिक मतदारसंख्या

Back to top button