Nashik News | दीड लाख ज्येष्ठ, दिव्यांग घरबसल्या करणार मतदान? | पुढारी

Nashik News | दीड लाख ज्येष्ठ, दिव्यांग घरबसल्या करणार मतदान?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आगामी लोकसभा निवडणुकीत ८० वर्षांवरील ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना घरबसल्या मतदानाची संधी उपलब्ध करून देण्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोग चाचपणी करते आहे. निवडणुकांच्या घोषणासोबत याबद्दलचा मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. हा निर्णय लागू झाल्यास नाशिकमध्ये १ लाख ५१ हजार ८१९ ज्ये‌ष्ठ व दिव्यांग घरून मतदानाचा हक्क बजावत राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करतील.

अवघ्या महिनाभरावर लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत सर्वशक्तीनिशी लढविण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगानेही प्रशासकीय तयारीला प्रारंभ केला आहे. निवडणुका अधिक पारदर्शक व निर्विघ्नपणे पार पाडताना मतदारांना अधिकधिक चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर आयोगाचा भर आहे. त्यादृष्टीने वयाची ८० वर्ष पूर्ण केलेल्या व्यक्ती तसेच दिव्यांगांना घरबसल्या मतदानाचा हक्क बजावण्याचा मोठा निर्णय आयोग घेऊ शकते.

देशात गेल्या वर्षी ५ राज्यांच्या निवडणुकांवेळी तेलंगणामध्ये प्रायोगिक तत्त्वावर ज्येष्ठांना घरबसल्या मतदानाचा हक्क बजावण्याची आयोगाने संधी उपलब्ध करून दिली. आयोगाच्या या प्रयत्नांना मोठा प्रतिसाद लाभला. त्यामुळे तेलंगणाच्या धर्तीवर आता देशभरात हा निर्णय लागू केला जाऊ शकतो. येत्या लाेकसभा निवडणुकांमध्ये त्याची अंमलबजावणीची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा निवडणूक शाखेने तयारी ठेवली आहे. हा निर्णय लागू झाल्यास जिल्ह्यात ८० वर्षावरील १ लाख ३२ हजार ५३२ ज्येष्ठ व १९ हजार २८७ दिव्यांगांना असे एकूण १ लाख ५१ हजार ८१९ मतदारांना त्याचा फायदा होईल. त्यामुळे आयोगाच्या निर्णयाकडे प्रशासनासोबत जिल्ह्यातील ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांच्या नजरा लागल्या आहेत.

स्वतंत्र्य व्यवस्था
दिव्यांग व ज्येष्ठांना मतदान केंद्रावर अतिरिक्त सोयी-सुविधा पुरवाव्या लागतात. त्यामध्ये प्रशासनाचा वेळ, पैसा व परिश्रम खर्ची पडतात. त्याउलट सदर घरबसल्या मतदानाची संधी उपलब्ध करून दिल्यास प्रशासनावरील अतिरिक्त ताण कमी होईल. या मतदारांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनाला केवळ पंधरा विधानसभा मतदारसंघनिहाय फिरते पथकाची व्यवस्था करावी लागणार आहे.

१६ हजार दिव्यांगांची नोंद
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी प्रशासनाच्या लेखी जिल्ह्यात २ हजार ९६८ दिव्यांग मतदार होते. त्यानंतर आयोगाच्या सूचनेनुसार प्रशासनाने दिव्यांग मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यासाठी दिव्यांगाशी निगडित काम करणाऱ्या संस्थांची मदत घेतली. आजच्या घडीला जिल्ह्यात १६ हजार ३१९ नव्याने दिव्यांग मतदारांची नोंदणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण दिव्यांग मतदारांची संख्या १९ हजार २८७ वर पाेहोचली आहे.

वयोगटनिहाय मतदार
वयोगट                       संख्या
१८-१९                       59314
२०-२९                      888416
३०-३९                    1097656
४०-४९                   1096774
५०-५९                     741392
६०-६९                      477905
७०-७९                      253861
८० प्लस                     132532
एकूण                      47,47,705

Back to top button