सोलापूरमध्ये दोन गटांत हाणामारी; दगडफेक | पुढारी

सोलापूरमध्ये दोन गटांत हाणामारी; दगडफेक

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : सोलापूर शहरातील मड्डीवस्ती येथे निंबाळकर व मुधोळकर या दोन गटांत पूर्ववैमनस्यातून हाणामारी झाली. मंगळवारी सायंकाळी हा प्रकार घडला. दोन्ही गटांने एकमेकांवर दगडफेकही केली. यामुळे तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी दोन्ही गटांतील 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

रविकांत नागनाथ मुधोळकर (वय 38, रा. मड्डीवस्ती) यांनी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार निंबाळकर गटातील लक्ष्मण निंबाळकर, चेतन निंबाळकर, पप्पू निंबाळकर, अतुल निंबाळकर सर्व (रा. मड्डीवस्ती, भवानी पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवारी (दि. 13) रविकांत हे घरात बसलेले होते. त्यावेळी त्यांच्या घराशेजारी राहणारे वरील चार आरोपी हे फिर्यादीच्या घरासमोर येवून शिवीगाळ करू लागले. तेव्हा रविकांतने त्यांना शिवीगाळ का करता असे विचारले. तेव्हा आरोपींनी रविकांत याला दगड व काठीने मारहाण केली. तसेच त्याला गच्ची पकडून ओढत नेत त्याच्या गळ्यातील साडेचार तोळ्याची सोन्याची चेन व 12 हजार 560 रूपये गहाळ झाले.

दरम्यान, याच्या परस्परविरूध्द राजश्री लक्ष्मण निंबाळकर (वय 28 रा. मड्डीवस्ती, भवानी पेठ) यांनी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार रवि मुधोळकर, सिमा मुधोळकर, रविची बहिण चिन्नू, मंगल, रविची आई मुक्ताबाई, नातेवाईक राहुल माने सर्व (रा. मड्डीवस्ती, भवानी पेठ) या सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, वरील आरोपींनी 11 जुलै रोजी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून राजश्री निंबाळकर हिच्या घराजवळ येवून शिवीगाळ करून रवि मुधोळकर याने तिला लाथ मारली. त्यावेळी राजश्रीचे पती लक्ष्मण व चेतन निंबाळकर हे भांडण सोडविण्यासाठी धावले. त्यावेळी वरील आरोपींनी दगडफेक करण्यास सुरूवात केली.

यात राजश्रीचा पुतण्या अतुल निंबाळकर, चेतन निंबाळकर हे दोघे जखमी झाले. हे सर्वजण शिवीगाळ करून जात असताना सीमा मुधोळकर हिचा भाऊ राहुल माने याने माझी पोलिसांत ओळख आहे, मी वकील आहे. आता तुम्हाला बघतो अशी धमकी दिली. दोन्ही तक्रारींवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.

Back to top button