हुडहुडी वाढली ! राज्यात थंडीची लाट ; सर्वात कमी तापमान नाशिकमध्ये | पुढारी

हुडहुडी वाढली ! राज्यात थंडीची लाट ; सर्वात कमी तापमान नाशिकमध्ये

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  हिमालयाकडे वाढलेला पश्चिमी चक्रावातामुळे उत्तर भारतातील सर्वच राज्यामध्ये दाट धुके तसेच तीव्र थंडीची लाट सुरू आहे. या भागाकडून राज्याकडे अतिशय थंड वारे वाहत आहेत. परिणामी, राज्याच्या सर्वच भागात बुधवारी थंडीची तीव्र लाट आली आहे. या थंडीच्या लाटेमुळे राज्यातील बहुतांश शहरांचे किमान तापमान सरासरीच्या खाली घसरले आहे .यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमान नाशिकमध्ये 9 अंश सेल्सिअस नोंदवले आहे. त्यापाठोपाठ नगर 9.3, पुणे 9.7 तर जळगावमध्ये 9.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. थंडीची तीव्र लाट आठवडाभर कायम राहिल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार हिमालयाच्या पायथ्याशी पश्चिमी चक्रावात सक्रीय आहे. तर दोन दिवसात आणखी एक चक्रावात तयार होणार आहे. या भागाकडून उत्तर भारताकडे अतिशय थंड वारे वाहत आहेत. यामुळे या भागात दाट धुके देखील तयार झाले आहे.
विशेषत: दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, जम्मु काश्मीर, बिहार, झारखंड, उत्तराखंड, मध्य प्रदेश या राज्यात थंडीने थैमान घातले आहे. या भागाकडून राज्याकडे अतीतीव्र थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर मध्यमहाराष्ट्र, मध्यमहाराष्ट्रात थंडीची तीव्र लाट आली आहे. बुधवारी दिवसभर राज्याच्या सर्वच भागात दिवसभर थंडी जाणवत होती. तर संध्याकाळच्या दरम्यान थंडीने चांगलाच जोर धरला. तर रात्री त्यामध्ये आणखी वाढ होऊन थंडीने नागरिकांना चांगलेच बेजार केले. दरम्यान राज्यात पुढील आठवडाभर थंडीचा कडाका राहणार आहे.

Back to top button