कांद्याबाबत सरकारला विचारण्याची 38 खासदारांमध्ये हिंमत नाही : खा. सुळे | पुढारी

कांद्याबाबत सरकारला विचारण्याची 38 खासदारांमध्ये हिंमत नाही : खा. सुळे

निरा : पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्रातील गप्प बसलेले 38 खासदार मला सभागृहाबाहेर चांगला प्रश्न उपस्थित केला म्हणून कौतुक करतात.परंतु त्यांच्यामध्ये शेतक-यांच्या कांद्याला भाव द्या म्हणून सरकारला विचारण्याची हिम्मत नाही, असा निशाणा खा. सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवर साधला. निरा (ता.पुरंदर) येथील व्यापारी व डॉक्टर यांच्याशी खा. सुळे यांनी संवाद साधला. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी निरेच्या सरपंच तेजश्री काकडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे, लक्ष्मणराव चव्हाण, संभाजीराव झेंडे, विजय कोलते, दत्तात्रय चव्हाण ,बबूसाहेब माहुरकर, पुष्कराज जाधव, उपसरपंच राजेश काकडे, चंदरराव धायगुडे , डॉ.वसंत दगडे, डॉ.सतीश खलाटे, पृथ्वीराज चव्हाण, राजेंद्र जैन, शांतिकमार कोठडिया यांच्यासह व्यापारी, डॉक्टर, ग्रामस्थ उपस्थित होते.

खा.सुळे म्हणाल्या की, निरा गावातील लोकांचे राहणीमान कसे वाढेल तसेच आर्थिक परिस्थिती व बाजारपेठ कशी वाढेल यासाठी प्रयत्न करणार आहे. या वेळी संदीप धायगुडे यांनी निरा येथील व्यापार वाढीसाठी निरा बाजार समितीत कांदा व गुळाचा मोठ्या प्रमाणात व्यापार सुरू करावा तसेच जेजुरी एमआयडीसीत रोजगारासाठी जाणा-या व येणा-या कामगारांच्या सोईकरिता पीएमटी सेवा सुरू करावी. मुस्लिम समाजाच्या मशिदीकडे जाणा-या रस्त्यावर रेल्वेच्या हद्दीत भुयारी मार्ग करण्याबाबत रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करावा तसेच उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय सुरू करावे आदी मागण्या मांडल्या.

निरा बाजार समितीचे संचालक राजकुमार शहा यांनी निरागाव गावठाण नसल्याने राष्ट्रीयीकृत बँकेकडून व्यापा-यांना कर्ज मिळत नसल्याने निरा गावठाण करण्याची मागणी केली. डॉ.राम रणनवरे यांनी निरा येथे रक्तपेढी सुरू करण्याची मागणी केली. जि.प.शाळेचे शिक्षक नवनाथ गायकवाड यांनी निरा येथील जि.प.शाळेच्या बांधकामासंदर्भातील अनुदानाबाबत असलेल्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणी सोडविण्याची मागणी केली. या वेळी सरपंच तेजश्री काकडे व उपसरपंच राजेश काकडे यांनी ग्रामस्थांच्या वतीने खा.सुप्रिया सुळे यांचा सत्कार केला. यावेळी दत्तात्रय चव्हाण यांनी प्रास्ताविक केले.तर स्वागत राजेश काकडे यांनी केले.

हेही वाचा :

Back to top button