इफ्फी : उत्कंठा वाढवणारा गूढ प्रवास ’बारदोवी’ | पुढारी

इफ्फी : उत्कंठा वाढवणारा गूढ प्रवास ’बारदोवी’

डॉ. अनमोल कोठाडिया

‘इमेगो’रुपी कोषावस्थेतून बाहेर पडण्याची सुंदरावस्था अनुभवल्यानंतर, करण चव्हाण हा तरुण दिग्दर्शक ‘बारदोवी’च्या गुढ प्रवासाला निघाला आहे, ज्यास उत्कंठतावर्धनाची झालर आहे. ‘इमेगो’ नंतर त्याचा ‘बारदोवी’ हा हिंदी भाषेत बनणारा चित्रपटदेखील इफ्फी दरम्यान होणार्‍या फिल्मबझारमध्ये फायनान्सर, वितरक यांना पाहण्यासाठी व्ह्यूइंग विभागात निवडला गेला आहे. त्या निमित्ताने-

अनेक आंतराष्ट्रीय महोत्सवांत गाजलेला ‘इमेगो’ ‘नेटफ्लिक्स’वरही उपलब्ध आहे. या मराठी चित्रपटाचा मेंटर या नात्याने एकूण निर्मिती प्रक्रियेचा मी एक साक्षीदार होतो. कोल्हापुरातील फाइन आर्टस् आणि एफटीआयआयमधून बाहेर पडलेल्या तरुण मंडळींनी नववास्तववादी शैलीत ‘इमेगो’ बनवला होतो. त्या शैलीशी हटकून वेगळा असणारा ’बारदोवी’ हा दृश्यात्मक पातळीवर तितकाच, मात्र वेगळ्या पद्धतीने वेधक झालाय. ’बारदोवी’ची कथा-पटकथा करण चव्हाण याने स्वतः लिहिलेली असून त्याच्याकडूनच ती चित्रीकरणापूर्वी ऐकली होती. ती ऐकतानाच दिग्दर्शकाच्या मनःपटलावर सारा सिनेमा तरळतो आहे, हे जाणवले होते.

महत्वाचे म्हणजे चित्रीकरणानंतर रफकटही पाहिलेला असल्याने येथे निदान कथनपद्धती आणि दृश्यात्मकतेबाबत तरी प्रशस्ती मी नक्कीच देऊ शकतो. ’इमेगो’चे छायाचित्रण करणार्‍या विक्रम पाटील यानेच ’बारदोवी’चेही छायाचित्रण केले आहे. तर कार्यकारी निर्माताही विकास डिगेच आहे. ही कोअर टीम वगळता बाकी सारा वेगळा संच आहे. अशा कोअरटीमला चित्रपट निर्मितीत अनावश्यक ढवळाढवळ न करणारे अमित जाधव आणि अर्जुन जाधव असे खंदे निर्माते मिळाले आहेत. त्यांचे हे चित्रपटनिर्मितीतील पदार्पण दमदार आहे. तरुण मुलांच्या नवनवीन कल्पनांना कवेत घेणारे असे निर्माते सार्‍यांनाच लाभोत. व्यावसायिक स्तरावर यशस्वी ठरण्याची क्षमता ’बारदोवी’मध्ये नक्कीच आहे.

’बारदोवी’ हा तसा गूढवादी, मृत्यनंतरच्या अवस्थेस उद्देशून असणारा शब्द आहे. या प्रवासास चित्तरंजन गिरी (लेथ जोशी), छाया कदम, आणि विराट मडके असा तगडा अभिनयसंच निघाला आहे. विधेनुसार अपेक्षित परिणाम साधण्याची जबाबदारी कलादिग्दर्शन- अरविंद मंगल, संकलन -शेखर गुरव, ध्वनीसंरचना – पियुष शहा, ध्वनीमुद्रण- आदित्य चव्हाण, संगीत -अनिकेत मंगरुळकर, वेशभूषा-वृषाली कामते यांनी सांभाळली आहे.

रावी किशोरच्या दोन कलाकृतींचा समावेश

‘फिल्म बाजार’मध्ये रावी किशोर या गोव्यात राहणार्‍या आणि बहुभाषिक चित्रपटांमधून काम करणार्‍या अभिनेत्रीच्या दोन कलाकृती आहेत. त्यापैकी ‘वाट’ (मीरांशा नाईक) हा मराठी चित्रपट व्ह्यूइंग विभागात, तर ‘पिकाबो (शमल चाको) हा हिंदी लघुपट लायब्ररी विभागात आहे.

हेही वाचलत का?

Back to top button