Jalgaon News : वाळू तस्करांकडून एरंडोलच्या प्रांताधिकार्‍यांचा गळा दाबून हत्येचा प्रयत्न | पुढारी

Jalgaon News : वाळू तस्करांकडून एरंडोलच्या प्रांताधिकार्‍यांचा गळा दाबून हत्येचा प्रयत्न

जळगाव : जिल्ह्यामध्ये पुन्हा वाळू तस्करांनी आपले डोके वर काढले असून एरंडोल येथील प्रांत अधिकारी मनीष कुमार गायकवाड यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर (दि. 12) रात्री हल्ला करून प्रांत अधिकाऱ्यांचा गळा दाबून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. वाळू तस्करांची दादागिरी इतकी वाढली आहे की त्यांनी चक्क खून करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यामध्ये पोलीस प्रशासन अपयशी ठरलेले दिसून येत आहे. महसूल विभाग वाळू चोरी रोखण्याचा प्रयत्न करीत असताना अवैध वाळू वाहतूक करण्यावर पोलीस प्रशासन वचक निर्माण करण्यात अपयशी ठरलेले दिसत आहे. त्यामुळेच वाळू तस्करांची हिम्मत वाढलेली आहे. वाळू तस्करांनी भुसावळ या ठिकाणी तहसीलदार यांच्या गाडीवर व कर्मचाऱ्यांवर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर एरंडोल तालुक्यात (दि. 12) रात्री असाच एक प्रकार उघडकीस आलेला आहे.

एरंडोल तालुक्यातील उत्राण अ. ह. शिवारातील गिरणा नदीच्या पात्रात प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड हे आपल्या सहकार्‍यांसह कारवाई करण्यासाठी गेले होते. ख्वाजा मिया दर्ग्याजवळ ते गेले असता तेथे दहा-बारा ट्रॅक्टर्स आढळून आले. पथकाला पाहताच यातील बरेचसे वाहने घेऊन पळून गेले.  दोन ट्रॅक्टर्स तेथेच असल्याने महसूल पथक कारवाई करण्यासाठी वाहनातून खाली उतरले. याप्रसंगी, चार-पाच जणांनी आवाज देऊन इतरांना बोलावले. या सर्वांनी प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांना खाली पाडून त्यांना गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. सहकार्‍यांनी प्रतिकार केल्याने अनर्थ टळला. तर, या गुंडांनी महसूल पथकावर जोरदार दगडफेक केली. यात प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांच्यासह सहकारी जखमी झाले आहेत.

या प्रकरणी उत्राणचे मंडळ अधिकारी प्रमोद मेघश्याम गायधनी यांनी कासोदा पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यानुसार, आकाश राजेंद्र पाटील,  अमोल ( पूर्ण नाव माहित नाही) ; राहूल ( पूर्ण नाव माहित नाही) ; दादाभाऊ ( पूर्ण नाव माहित नाही ) आणि सागर ( पूर्ण नाव माहित नाही ) या सर्वांच्या विरोधात भाग ५, गुरनं ०१/२०२४ भादंवि कलम-३०७, ३५३, ३३२, ३२३, ३७९, १४३, ५०४, ५०६ आणि महाराष्ट्र जमीन महसूल आ. नियम ४८ (७) (८) खाण आणि खनिज अधिनियम २१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक अमोल गुंजाळ हे करीत आहेत.

मनीषकुमार गायकवाड यांच्यावर आधी वाळू तस्करांनी पाळत ठेवल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. यानंतर आता वाळू तस्करांनी थेट त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. राजकीय पाठबळ असल्याने वाळू माफिया माजले असून त्यांनी आता प्रांताधिकार्‍यांचा खून करण्याचा प्रयत्न केला असून आता तरी त्यांच्या विरोधात कठोर कारवाई होणार का? असा प्रश्‍न आता विचारण्यात येत आहे. गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस प्रशासन त्याच्यावर सक्तीने कारवाई का करत नाही? का पोलीस प्रशासनाला आरोपी मिळत नाही असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

Back to top button