पंतप्रधान मोदींचा नाशिक दौरा, हजारो पोलिसांचा फौजफाटा तैनात राहणार | पुढारी

पंतप्रधान मोदींचा नाशिक दौरा, हजारो पोलिसांचा फौजफाटा तैनात राहणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारी (दि.१२) शहरात येत आहेत. त्यानुसार शहर पोलिस दलाने बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. शहरात सुमारे अडीच हजार पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात राहणार असून त्यासाठी राज्यभरातून पोलिस दाखल होणार आहेत. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून प्रतिबंधात्मक कारवाईत वाढ करण्यात आली आहे.

१२ जानेवारीला तपोवनातील मैदानावर होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहर व जिल्हा पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. सुरक्षा यंत्रणांशी समन्वय ठेवत बंदोबस्ताची आखणी करण्यात येत आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी यासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेत पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखा, विशेष शाखा, गोपनीय शाखा, दहशतवादी विरोधी कक्ष, राज्य गुप्तवार्ता, राज्य गुन्हे अन्वेषण यासह सर्व विभागांचा आढावा घेतला. पंतप्रधान दौऱ्याचे व सुरक्षेचे नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे. अतिमहत्त्वाच्या बंदोबस्तामुळे वाहतूक मार्गात बदल केले जातील. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव शहरात काही अटी-शर्ती व निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. यासह बंदोबस्तासाठी शहरात दाखल होणाऱ्या पोलिसांच्या निवास व्यवस्थेचेही नियोजन सुरू आहे.

प्रतिबंधात्मक कारवाईवर भर

सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शहर पोलिसांनी शहरातील सायबर कॅफे, बस-रेल्वे स्थानके, हॉटेल, लॉज, महत्वाची स्थळांची नियमित तपासणी सुरु केली आहे. तसेच शहरातील भाडेकरूंची तपासणी केली जात आहे. गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. सर्व सुरक्षा यंत्रणांशी समन्वय व चर्चा साधली जात आहे.

शहरातील सुमारे ८०० पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असेल. तसेच राज्यातून सुमारे दोन ते अडीच हजार पोलिसांची अतिरिक्त कुमक अपेक्षित आहे. शहरातील महत्वाच्या ठिकाणांची नियमित तपासणी केली जात आहे.

– प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त,

हेही वाचा :

 

Back to top button