Nashik News : युवा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा : डॉ. भारती पवार | पुढारी

Nashik News : युवा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा : डॉ. भारती पवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड ही अभिमानाची बाब असून, हा महोत्सव यशस्वी करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे या महोत्सवाचे समन्वयाने सूक्ष्म नियोजन करून हा महोत्सव सर्वांच्या सहभागाने यशस्वी करावा, अशा सूचना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तथा आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्या.

नाशिक येथे येत्या १२ ते १६ जानेवारीदरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या नियोजनाबाबत जिल्‍हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात घेतलेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. तपोवनातील मैदानावर १२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन होईल, तेथील व्यासपीठावरील आसनव्यवस्था, ग्रीनरूममधील सुविधा तसेच भोजन, निवास, पाण्याची व्यवस्था व स्वच्छतागृह याबाबत आढावा घेण्यात आला. आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधांची सज्जता ठेवावी. तसेच व्यासपीठावरील आसनव्यवस्था, ग्रीनरूममधील सुविधा तसेच भोजनव्यवस्था, निवासव्यवस्था, पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह याबाबत आढावा घेण्यात आला. तसेच प्रधानमंत्री यांच्या स्वागतासाठी करण्यात येणाऱ्या रोड शो चे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे, असे मंत्री डॉ. पवार यांनी सांगितले. यासोबतच या महोत्सवानिमित्त मॉनिटरिंग करणारे महत्त्वाचे अधिकारी व संबंधित व्यक्तींचा व्हाॅट्सॲप ग्रुप तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी केली.

या महोत्सवात २८ राज्ये व आठ केंद्रशासित प्रदेशामधील युवा चमू, राष्ट्रीय सेवा योजना, नेहरु युवा केंद्र संघटना यांचे स्वयंसेवक, परीक्षक व इतर मंत्रालय अधिकारी व कर्मचारी असे साधारण आठ हजार युवक सहभागी होणार आहेत. या सर्वांना ओळखपत्र किंवा ड्रेस कोडबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. दुरदृष्यप्राणालीद्वारे क्रीडा आयुक्त सुहास धिवसे यांनी महोत्सवाच्या आयोजनासाठी नियुक्त समित्यांची माहिती दिली.

यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, मनपाचे शहर अभियंता शिवकुमार वंजारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे, क्रीडा उपसंचालक रवींद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील (नाशिक), अविनाश टिळे (धुळे) यांच्यासह महोत्सव समिती व उपसमितीचे सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button