Waluj MIDC Fire : जॅकेट आणि हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; ६ कामगारांचा होरपळून मृत्यू | पुढारी

Waluj MIDC Fire : जॅकेट आणि हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; ६ कामगारांचा होरपळून मृत्यू

वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगरमधील जॅकेट आणि हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीत रविवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास मोठा स्फोट होऊन आग लागली. या आगीत सहा कामगारांचा झोपेत असतानाच होरपळून मृत्यू झाला. तर १५ कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत या आगीचा थरार होता. अग्निशमन दलाच्या सहा बंबाच्या सहायाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

वाळूज एमआयडीसीतील सी सेक्टर मधील शाईन इंटरप्राईजेस या कंपनीला आग लागली. कामगार झोपेत असताना अचानक स्फोट झाला. या आगीत मोहम्मद मुस्ताक मोहम्मद इब्राहिम (वय ६२), कोशर आलम जफरुद्दिन (वय ३७), मोहम्मद इकबाल मोहम्मद एहरार (वय १७), मोहम्मद मार्गब आलम (वय ३२) अशी होरपळून मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत. तर दोन मृत कामगारांची नावे समजू शकलेली नाहीत. काही कामगारांनी झाडाच्या साह्याने वर चढून उड्या मारल्याने जीव वाचला.

वाळूज येथील सी सेक्टर २१५-१६ सेक्टर मध्ये शाईन इंटरप्राईजेस या कंपनीत हँडग्लोज तसेच रिफ्लेक्टर जॅकेटचे उत्पादन घेतले जाते. शनिवारी मध्यरात्री कंपनीत मोठा स्फोट होवून कंपनीला आग लागली. आगीने क्षणार्धात कंपनीला वेडा घातल्याने कंपनीच्या आत तीन खोलींमध्ये झोपलेले कामगार आत अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी यातील काही कामगारांना सुखरूप बाहेर काढले. मात्र या घटनेत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला.

Back to top button