Nashik Civil Hospital : जिल्हा रुग्णालयातील सात कंत्राटी डॉक्टरांना नारळ | पुढारी

Nashik Civil Hospital : जिल्हा रुग्णालयातील सात कंत्राटी डॉक्टरांना नारळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; सेवानिवृत्तीनंतर आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने सेवा बजावणाऱ्या सात डॉक्टरांचे कामकाज थांबवण्याचा निर्णय जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे यांनी घेतला आहे. डॉ. शिंदे यांनी डॉक्टरांच्या कामकाजाचा आढावा घेतला असता, त्यांनी अपेक्षेप्रमाणे सेवा बजावली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानुसार डॉ. शिंदे यांनी कंत्राटी डॉक्टरांचे कंत्राट संपवण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी (दि.२२) त्यावर निर्णय होणार आहे. या कारवाईमुळे जिल्हा रुग्णालयासह इतर रुग्णालयांमधील कामचुकार डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनाही दणका बसला आहे. (Nashik Civil Hospital)

जिल्हा शासकीय रुग्णालयात क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी येतात. अशा वेळी रुग्णसेवेसाठी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज असते. त्यामुळे आरोग्य विभागातूनच सेवानिवृत्त झालेल्या डॉक्टरांच्या अनुभवाचा वापर करण्यासाठी त्यांना कंत्राटी पद्धतीने नेमले जाते. त्यानुसार जिल्हा रुग्णालयाच्या एसएनसीयू कक्षात सात कंत्राटी डॉक्टर नेमले आहेत. मात्र, डॉ. शिंदे यांनी घेतलेल्या आढाव्यात त्यापैकी अनेक डॉक्टर सेवा बजावत नसल्याचे आढळून आले, तर काही डॉक्टर दुसऱ्याच विभागात बसत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अशा सात डॉक्टरांचे कंत्राट रद्द करण्याचे आदेश दिल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. तसेच त्यांच्या जागी नव्याने भरतीप्रक्रिया राबवून डॉक्टर नेमले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :

Back to top button