खा. शरद पवारांच्या घाटातील ‘एन्ट्री’ने आमदारांना ‘टेन्शन’

खा. शरद पवारांच्या घाटातील ‘एन्ट्री’ने आमदारांना ‘टेन्शन’

मंचर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी खेड तालुक्यातील चर्‍होली येथील 'साहेब केसरी' बैलगाडा शर्यतीच्या घाटात हजेरी लावून 'मी अजून तरुण आहे, भल्या भल्यांना वाकवण्याची ताकद माझ्यात आहे', असे सूचक विधान केले. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार गटात गेलेल्या खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील आमदारांचे 'टेन्शन' वाढले असून, शरद पवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे.

बैलगाडा शर्यती सुरू पुन्हा करण्यासाठी शरद पवार यांचे योगदान मोठे असून, त्या नव्याने सुरू झाल्यापासून त्यांनी कधीही बैलगाडा घाटात हजेरी लावली नव्हती. बदलते राजकारण लक्षात घेता त्यांनी चर्‍होली घाटात हजेरी लावत आपल्या भाषणातून अनेकांना सूचक इशारा देत त्यांचे 'टेन्शन' वाढवले आहे. युवकांना चैतन्य देत त्यांनी भाषण केल्यामुळे उत्तर पुणे जिल्ह्यात हे भाषण चर्चेचा विषय बनले आहे.

पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राजकारण हे बैलगाडा शर्यतीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. आंबेगाव, खेड, जुन्नर, भोसरी, शिरूर, मावळ, हवेली तालुक्यातील राजकारण हे बैलगाडा शर्यतीच्या आसपास फिरते. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे बैलगाडा मालकांच्या पाठिंब्यामुळेच खासदार म्हणून यापूर्वी निवडून आलेले आहेत. मागील वेळेस डॉ. अमोल कोल्हे हेदेखील 'बैलगाडा शर्यत सुरू करू' असा शब्द दिल्याने त्यांनाही बैलगाडा मालकांनीच निवडून दिले आहे. बैलगाडा घाटात बैलगाडा शौकीन, बैलगाडाप्रेमी, बैलगाडामालक यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, तसेच निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणारा तरुण मतदारवर्गही बैलगाडा घाटात मोठ्या प्रमाणात असल्याने ही नस ओळखून शरद पवार यांनी थेट बैलगाडा घाटात 'एन्ट्री' करत विरोधकांना आव्हान दिले आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील आंबेगाव, खेड, जुन्नर, तालुक्याचे आमदार हे उपमुख्यमंत्री अजित पवार गटात असून, शरद पवार यांनी घाटातून थेट त्यांना इशारा दिल्याचे बोलले जात आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, खेड, जुन्नर, शिरूर, हवेली, मावळ, भोसरीमध्ये मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यती भरवल्या जातात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांनी पक्षाच्या माध्यमातून वेळोवेळी केंद्रीय मंत्री, तसेच राज्य पातळीवर पाठपुरावा करत बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र या शर्यतींदरम्यान त्यांनी घाटात येऊन प्रथमच भाष्य केले आहे.

घाटात येऊन विरोधकांची कोंडी करणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी आजपर्यंत कधीही बैलगाडा शर्यतीच्या घाटात येऊन राजकीय भाष्य केले नाही. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये बदललेली राजकीय परिस्थिती पाहता त्यांनीही बैलगाडा घाटात येऊन दंड थोपटले आहेत. या पुढील काळात ते विविध बैलगाडा शर्यतींच्या घाटांमध्ये उपस्थित राहून अजित पवार गट व विरोधी पक्षात असलेल्या आमदारांची राजकीय कोंडी करणार आहेत, अशी चर्चा राजकीय जाणकार करत आहेत.

तरुणांचा मिळाला प्रतिसाद
शरद पवार पहिल्यांदाच बैलगाडा शर्यत सोहळ्याला उपस्थित राहत 'काहीजण मला म्हणतात तुम्ही 83 वर्षांचे आहात. पण मी अजूनही तरुणच आहे, लवकरच नवा इतिहास घडविणार', असा निर्धार बैलगाडा घाटात केल्याने त्यांना प्रतिसाद म्हणून तरुणांनी मोठ्या प्रमाणात टाळ्यांच्या कडकडाट केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news