Buldhana Bribe Case : जीएसटी अधिकाऱ्यास अडीच लाखांची लाच देणारा व्यापारी एसीबीच्या जाळ्यात | पुढारी

Buldhana Bribe Case : जीएसटी अधिकाऱ्यास अडीच लाखांची लाच देणारा व्यापारी एसीबीच्या जाळ्यात

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा : दालमील कंपनीचा थकित टॅक्स कमी करण्यासाठी खामगाव येथील जीएसटी अधिका-याला अडीच लाख रूपयांची लाच देतांना मलकापूर येथील दालमिल व्यापाऱ्याला जालना अँटी करप्शन ब्यूरोच्या पथकाने रंगेहाथ पकडले. बुधवार २० डिसेंबर रोजी खामगाव जीएसटी कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर व्यापारक्षेत्रात खळबळ उडाली आहे. प्रविण मदनलाल अग्रवाल रा. मलकापूर असे आरोपी व्यापा-याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सहाय्यक राज्यकर आयुक्त, वस्तु व सेवाकर विभाग, खामगाव (जि. बुलढाणा) यांनी, दालमिल व्यवसायिक प्रविण मदनलाल अग्रवाल (वय ४४) मलकापूर जि. बुलढाणा यांच्या मे. बजरंग दालमिल इंडस्ट्रीजने २०१७-१८ या वित्तीय वर्षाचा २ कोटी ७७ लाख रूपयांचा टॅक्स थकवल्याने व्याजासह २ कोटी ९४ लाख रूपयांचा टॅक्स थकबाकी भरणा करणेबाबत तीनवेळा नोटीस बजावली होती. तसेच टॅक्सचा भरणा न केल्यास डिसेंबर २०२३ मध्ये मालमत्ता जप्तीची फायनल ऑर्डर काढण्यात येईल, असे कळविले होते.

त्यानंतर व्यापारी अग्रवाल हा टॅक्स कमी करुन फायनल ऑर्डर नील काढुन द्या, त्यासाठी तीन लाख रुपये देतो, असे म्हणून जीएसटी अधिका-याला लाच घेण्याची अपप्रेरणा देत होता. दरम्यान याबाबत संबंधित अधिका-याने जालना एसीबी कडे तक्रार नोंदवली. त्यावरून बुधवार दि.२० डिसेंबर रोजी एसीबी जालनाच्या पथकाने खामगाव येथे तक्रारीची पडताळणी करून सापळा लावला. कारवाई दरम्यान तक्रारदार अधिका-याच्या इच्छेविरुद्ध व्यापारी प्रविण अग्रवाल याने पंचासमक्ष सहाय्यक आयुक्त, वस्तु व सेवाकर विभाग कार्यालय खामगाव जि. बुलढाणा यांचे कक्षातील टेबलवर दोन लाख पन्नास हजार रुपये लाचेची रक्कम ठेवली असता आरोपी व्यापा-यास एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले. लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून व्यापाऱ्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाणे खामगाव शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई किरण बिडवे पोलीस उपअधीक्षक, अँटी करप्शन ब्यूरो जालना, हे.का.गजानन घायवट, शिवाजी जमधडे, पो.का.गणेश बुजाडे, गणेश चेके आदींच्या पथकाने केली.

हेही वाचा : 

Back to top button