रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : जमीन किंवा एखाद्या इमारतीमधील फ्लॅटच्या नकाशावर सात-बारा उतारासह रेडीरेकनर दरही दिसणार आहेत. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग अशा स्वरुपाची सुविधा लवकरच उपलब्ध करून देणार आहे. यामुळे खरेदी करत असलेली जमीन किंवा एखाद्या इमारतीमधील फ्लॅटचे रेडीरेकनर दर किती आहे हे आता नकाशा व सात बारा उताऱ्यासह दिसणार आहेत. ही योजना कोकणातील जिल्ह्यांमध्ये डिसेंबरअखेर पर्यंत सुरू होणार आहे. त्यामुळे जाहीर होणारे रेडीरेकनर दर हे याच नकाशांवरून ऑनलाईन पाहता येणार आहे.
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून दरवर्षी रेडीरेकनर दर जाहीर केले जातात. त्यात जिल्हा, तालुका व गट क्रमांकानुसार हे दर संकेतस्थळावर पहायला मिळतात. मात्र, हेच दर आता एखाद्या गटाच्या किंवा इमारतीच्या नकाशासह उपलब्ध होणार आहेत.
नागपूर येथील महाराष्ट्र प्रादेशिक सुदूर संवेदन केंद्राची मदत घेतली जाणार आहे. या केंद्राकडे राज्यातील सर्व जिल्हे तालुके व गटनिहाय नकाशे उपलब्ध आहेत. मुद्रांक व नोंदणी शुल्क विभाग या सर्व गटांना रेडीरेकनरचे दर उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी विभागाकडे असलेल्या नगर नियोजन विभागाची मदत घेतली जाणार आहे.
या सुविधेमुळे खरेदी करत असलेली एखादी जमीन किंवा शहरी भागातील एखाद्या इमारतीमधील फ्लॅट दृश्यमान पद्धतीने दिसणार आहे. खरेदी करण्यात येणारी जमीन किंवा फ्लॅट ग्रीन झोनमध्ये आहे किंवा नाही? याची त्यांना खात्री करता येत नाही. मात्र, अशा पद्धतीने संबंधित गटाचा नकाशा रेडीरेकनर दर व सात-बारा उतारा असल्यास त्यावरून खरेदीपूर्व खातरजमा करता येणार आहे.