राज्यातील हातभट्टीमुक्त गाव मोहीम यशपथावर

राज्यातील हातभट्टीमुक्त गाव मोहीम यशपथावर

रायगड : राज्यात हातभट्टीच्या दारूमुळे सामाजिक आणि आरोग्यविषयक होणार्‍या दुष्परिणामावर प्रभावी व कायमस्वरूपी नियंत्रण आणून संपूर्ण राज्य हातभट्टीमुक्त करण्याचा संकल्प राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्तडॉ. विजय सूर्यवंशी यांनी केला आहे. त्यांच्या संकल्पास आठ महिन्यांत लक्षवेधी यश लाभत असल्याचे दिसून येत आहे. आयुक्तपदाची धुरा स्वीकारल्यानंतर खात्यांतर्गत मोठे दल त्यांनी अमलात आणल्याने हे परिवर्तन घडून येत आहे.

अवैध मद्य विक्री आणि त्यातही हातभट्टीच्या निर्मितीची प्रक्रियाच समूळ नष्ट करण्याची मोहीम राज्यात हाती घेण्यात आली आहे. यामुळे हातभट्टीविरुद्धच्या गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणात कारवाई झाली असून गेल्या 5 वर्षांतील हातभट्टीचे सरासरी गुन्हे विचारात घेता त्याच्या 88 टक्के एकूण गुन्हे तसेच 124 टक्के वारस गुन्हे या वर्षी नोव्हेंबरअखेरपर्यंत राज्यात नोंदविले गेले आहेत. या कालावधीत 7.54 लाख लिटर इतकी हातभट्टी दारू व 134.96 लाख लिटर इतके त्यासाठी लागणारे रसायन जप्त करून नष्ट केले आहे. एकूण 2 हजार 437 वाहने व त्यापैकी 1 हजार 165 वाहनेे केवळ हातभट्टींच्या गुन्ह्यात जप्त करण्यात आली आहेत.

राज्यातील साधारणतः नोव्हेंबर 2022 पासून देशी मद्याच्या विक्रीत होत असलेली घट या मोहिमेमुळे बंद होऊन त्यात देशी मद्यात जुलै 2023 पासून वाढ होत असून ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये श्रावण महिना असतानाही देशी मद्य विक्री या कारवाईमुळे वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे शासनाच्या महसुलातही मोठी वाढ झाली आहे. जुलै ते नोव्हेंबर 2023 या पाच महिन्यांच्या कालावधीत देशी मद्यातील वाढीमुळे सुमारे 67 कोटी रुपयांच्या शासन महसुलात भर पडल्याचे दिसून आले आहे.

प्रतिबंधात्मक कारवाईच्या मोहिमाच राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात सक्रीय करण्यात आल्याने हातभट्टीच्या अवैध व्यवसायात गुंतलेल्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध मागील 4 वर्षांच्या अशा कारवाईच्या सरासरीच्या जवळजवळ अडीच पट इतकी प्रकरणे या वर्षी दाखल होऊन 38 टक्के प्रकरणांत बंधपत्रेही (बाँड) घेण्यात आली आहेत. ती मागील 4 वर्षांच्या सरासरीच्या 213 टक्के इतकी मोठी आहे. याचा परिणाम म्हणून अशा प्रकारच्या व्यवसायात गुंतलेल्या सराईत गुन्हेगारांवर मोठा वचक बसला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या राज्यभरातील या कारवाईमुळे अशा प्रकारच्या धंद्यात गुंतलेल्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये कारवाईची मोहीम जोरात सुरू केल्यामुळे यावर्षी 7 डिसेंबरअखेर 127 अशा गुन्हेगारांविरुद्ध प्रस्ताव दाखल झाले असून त्यापैकी 18 गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीए अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश झाले असून त्यामुळे अशा प्रकारच्या व्यवसायात गुंतलेल्या सराईत गुन्हेगारांची तथाकथित साम्राज्ये उद्ध्वस्त झाली आहेत.

हातभट्टीमुक्त गाव ही संकल्पना अमलात आणतानाही या दारूच्या केवळ भट्ट्या उद्ध्वस्त करून रसायने जप्त करण्याची कारवाई करून बेवारस गुन्हे दाखल होत असत. त्यामुळे हे व्यवसाय कालांतराने पुन्हा सुरू होत असत. मात्र आता आरोपींना अटक करून त्यांच्यावर कारवाई होत आहे. पूर्वी बंधपत्र रक्कम खूप कमी होती. ती आता एक लाख ते दोन लाख केल्याने हे बंधपत्र तोडून कुणी पुन्हा त्या व्यवसायाकडे वळत नाही. त्याच बरोबर या बेकायदा व्यवसायातील लोकांना दुसरा सन्मानपूर्वक व्यवसाय करण्याकरिता प्रेरित करण्यात येत आहे. लवकरच महाराष्ट्रातील प्रत्येक गाव हातभट्टीमुक्त होईल.
– डॉ.विजय सूर्यवंशी, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news