नागपूर : नाराजीनाट्यानंतर मंत्री, आमदारांचे फोटोसेशन

नागपूर : नाराजीनाट्यानंतर मंत्री, आमदारांचे फोटोसेशन

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूरच्या अधिवेशनाची आठवण म्हणून विधानसभेच्या सर्व सदस्यांचे एकत्रित छायाचित्र काढण्याची प्रथा आहे. हे फोटो काढताना सकाळी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर होते. त्यांच्या गैरहजेरीत आमदारांनी विधान भवनाबाहेर फोटो काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, विधानसभेत त्यावर विरोधकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर सभागृहाचे कामकाज अर्धा तासासाठी तहकूब केले. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांसह मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री आणि आमदारांचे एकत्रित छायाचित्र काढण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सरकारचे नागपूर येथे सुरू असलेले विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे शेवटचे अधिवेशन आहे. अधिवेशनाची आठवण म्हणून सर्व सदस्यांचे एकत्रित छायाचित्र काढण्याची प्रथा आहे. मात्र, गुरुवारी छायाचित्र काढण्याच्या नियोजनावरून विधिमंडळ प्रशासनात गोंधळ उडाला. विधानसभा सदस्यांचे एकत्रित छायाचित्र घेण्यासाठी गुरुवारी सकाळी 10.50 ची वेळ निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार विधान भवनासमोर आसनव्यवस्था केली होती. मात्र, सभागृह सकाळी 11 वाजता सुरू होईपर्यंत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत छायाचित्र काढण्याचा प्रयत्न झाला. अजित पवार यांनी आज बहुतांश सदस्य उपस्थित असल्याने प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर सभागृह 15 मिनिटे तहकूब करावे व छायाचित्र काढावे, असे सुचविले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही सूचना मान्य करीत प्रश्नोत्तराच्या तासानंतर छायाचित्र काढण्याचे मान्य केले.

राजशिष्टाचार पाळला गेला पाहिजे : जयंत पाटील

विधानसभेचे कामकाज सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उशिरा आले. प्रथम निवडून आलेले आमदार हे पहिल्या रांगेत होते. तर ज्येष्ठ सदस्य हे शेवटच्या रांगेत होते. हे विधानसभा सदस्यांचे फोटोसेशन आहे, मंत्र्यांचे नाही. त्यामुळे एकत्रित छायाचित्र काढताना राजशिष्टाचार पाळला गेलाच पाहिजे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news