नागपूर : केंद्र शासनाने देशातील परदेशी गुंतवणुकीची (एफडीआय) आकडेवारी जाहीर केली असून, तीन महिन्यांत 28 हजार 828 कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक राज्यात आली आहे. परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली.
शेकापचे जयंत पाटील यांनी राज्यातील उद्योगांबाबत उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेवरील उत्तरात उदय सामंत यांनी ही माहिती दिली. यावेळी उद्योगांसाठी संपादित केलेल्या जमीनींबाबत विचारलेल्या प्रश्नांवर सामंत म्हणाले की, कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्याचे काम सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या शंका दूर केल्या जातील. त्या ठिकाणच्या 75 टक्के जमिनी खासगी आहेत. 25 टक्के जिल्हाधिकारी यांच्याकडे आहेत. खासगी जमिनीबाबत मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेण्यात येईल. तसेच जिल्हाधिकार्यांकडे असलेल्या जमिनी शेतकर्यांना परत करण्याचे निर्देश दिले जातील.