नागपूर : साहित्य संमेलनासाठी दोन कोटींचे अनुदान | पुढारी

नागपूर : साहित्य संमेलनासाठी दोन कोटींचे अनुदान

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. या संमेलनाच्या आयोजनासाठी महामंडळाला आता दोन कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे. गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगावच्या अमळनेरमध्ये भरवण्यात येणार आहे. त्यासाठी हा निधी लवकरच महामंडळाकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मराठी तितुका मेळवावा – विश्व मराठी संमेलनात साहित्य संमेलनाच्या अनुदानात वाढ करण्याचे सूतोवाच केले होते. मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सध्या साहित्य संमेलन आयोजनासाठी 50 लाख रुपयांचे अनुदान दिले जात होते.

कौशल्य विकास विद्यापीठांच्या नियंत्रणासाठी एकच कायदा

राज्यात स्वयंअर्थसहाय्यित कौशल्य विकास विद्यापीठांच्या नियंत्रणासाठी एकच कायदा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तसेच राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या सहा ठिकाणच्या पर्यटनस्थळांचा खासगीकरणाच्या माध्यमातून विकास करण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकठीत प्रस्तावित महिला धोरणावरही चर्चा झाली. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री दादा भुसे यांनी काही सूचना केल्याने ते मंजूर होऊ शकले नाही.

समन्वय समितीत महामंडळ वाटपाची चर्चा

या मंत्रिमंडळ बैठकीनंतर महायुतीच्या तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकीत रखडलेल्या महामंडळ वाटप आणि नियुक्त्यांवर चर्चा करण्यात आली. लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असून त्यापूर्वी या नियुक्त्या व्हाव्यात. अधिवेशन संपताच महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरवावा, असे या बैठकीत ठरले.

अवकाळीग्रस्तांसाठी सोमवारी पॅकेज

राज्यातील अवकाळी पाऊस आणि दुष्काळग्रस्तांना द्यावयाच्या मदतीबाबतही मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. त्याबाबत मुख्यमंत्री सोमवारी किंवा मंगळवारी सभागृहात पॅकेज जाहीर करू शकतात.

Back to top button