

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : येथील न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक न्यायालयात न्या. एम. डब्ल्यू. शेख व न्या. रोहन थाईल यांनी घटस्फोटासाठी दाखल पती-पत्नीच्या खटल्यात, अवघ्या दहा मिनिटांमध्ये या दोघांचे समुपदेशन करत मनोमिलन केले व पुन्हा एकदा त्यांचा संसार सुखाचा सुरू केला. अॅड. उत्तमराव नेवसे यांनी पुढाकार घेत या कुटुंबाची विस्कटणारी घडी सावरली. न्यायाधीशांच्या हस्ते या पती-पत्नींचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून कौतुक केले. जिल्हा न्यायालय व कर्जत येथील विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोकन्यायालयाचे कर्जतला आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड. कैलास शेवाळे, उपाध्यक्ष प्रतिभा रेणुकर, सचिव काकासाहेब पांडुळे, खजिनदार अविनाश मते यांच्यासह अनेक विधिज्ञ, नागरिक उपस्थित होते.
न्या.शेख म्हणाले, न्यायव्यवस्थेमध्ये लोकन्यायालयाचे महत्त्व अतिशय मोठे आहे. या न्यायालयामध्ये दिलेल्या निकालाला कुठेही अपील करता येत नाही. लोक न्यायालयामध्ये नागरिकांनी त्यांची खटले चालविल्याने कमी वेळेत व अतिशय कमी खर्चात नागरिकांना न्याय मिळतो. लोकन्यायालयात तोडजोड करून पुन्हा सर्व काही सुरळीत करण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे नागरिक व सर्व वकिलांनी आपले खटले लोकन्यायालयात चालवावेत.
अॅड.नेवसे म्हणाले, मिरजगाव परिसरातील पती-पत्नीचा खटला माझ्याकडे घटस्फोटासाठी दाखल झाला होता. त्यांच्यात आपसात काही गैरसमज झाले होते. मात्र, न्या. शेख व न्या. थवील यांनी त्यांचे मनोमिलन घडवून आणले. अॅड.शेवाळे म्हणाले, पूर्वी लोक चावडीवर बसून न्यायनिवाडा करत आणि नागरिकांना न्याय मिळे. याच धर्तीवर लोकन्यायालय देखील काम करत आहे. यामध्ये सर्वांनी आपले जास्तीत जास्त खटले आणून सोडवून घ्यावेत. अॅड.प्रतिभा रेणुकर यांनी आभार मानले.