नागपूर : कांदा निर्यातबंदी हे शेतकरी विरोधी धोरण : अंबादास दानवे | पुढारी

नागपूर : कांदा निर्यातबंदी हे शेतकरी विरोधी धोरण : अंबादास दानवे

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा केंद्र सरकारने केलेली कांदा निर्यात बंदी हे शेतकरी विरोधी धोरण असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी कांद्यावरील निर्यातबंदी हटवली पाहिजे, कांद्याला भाव मिळाला पाहिजे या मागणीसाठी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर कांदयांच्या माळा हातात घेऊन महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

कांद्याला ४ हजार ५०० रुपये इतका भाव असताना कांदा बंदी निर्यात केल्यावर तासाभरातच तो घसरून १२०० रूपये इतका झाला. निर्यातबंदी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

कांदा निर्यात बंदी ही केंद्राच्या मोदी सरकारने केली. त्याला राज्य सरकारने विरोध केला पाहिजे होता, मात्र ते मुग गिळून गप्प बसले अशा शब्दात सत्ताधाऱ्यांवर दानवे यांनी निशाणा साधला.

एकप्रकारे कांदा निर्यात बंदी करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर केंद्र सरकारने आघात व अन्याय केला आहे. महाविकास आघाडी या शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही दानवे यांनी शेतकऱ्यांना दिली. तर कांदा निर्यातबंदी बाबत सरकारला सभागृह व सभागृहाबाहेर सळो की पळो करून सोडणार असा इशारा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला.

हेही वाचा : 

Back to top button