Nashik News : ११ रुपयांच्या पावभाजीला पोलिसांचा ‘तडका’, नेमकं काय प्रकरण? | पुढारी

Nashik News : ११ रुपयांच्या पावभाजीला पोलिसांचा 'तडका', नेमकं काय प्रकरण?

नाशिक : इंदिरानगर परिसरातील रथचक्र चौकात एका हॉटेल चालकाने ‘फक्त अकरा रुपयांत पावभाजी’ अशी सोशल मीडियावर जाहिरात करीत खवय्यांची गर्दी जमवली. मात्र त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाल्याने इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत संबंधित हॉटेल चालकास समज दिली. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात पोलिसांच्या कारवाईचा झटका हॉटेल चालकास बसला.

इंदिरानगर पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी (दि.३) सायंकाळी पाच ते रात्री आठ यावेळेत रथचक्र चौकात एका पावभाजी दुकानाबाहेर खवय्यांची गर्दी झाली. २०० ते ३०० नागरिकांची गर्दी झाल्याने त्यांनी त्यांच्याकडील वाहने रस्त्यालगत व मिळेल त्या ठिकाणी लावून पावभाजीचा आस्वाद घेतला. मात्र त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. हा प्रकार लक्षात आल्याने पोलिसांनी पाहणी केली असता ११ रुपयांच्या पावभाजीमुळे गर्दी झाल्याचे लक्षात आले. पोलिसांनी हॉटेल चालकास समज देत गर्दी नियंत्रणात आणली.

तसेच, विनापरवानगी जमाव एकत्रित करून वाहतुकीस व पादचाऱ्यांना अडथळा होईल, असे कृत्य केल्याने हॉटेल चालकाविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. कोणत्याही ठिकाणी विनापरवानगी कार्यक्रम वा गर्दी न जमविण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

हेही वाचा :

Back to top button