पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थान विधानसभा निवडणूक मतमोजणी कल येण्यास सुरूवात झाली आहे. निवडणुक आयोगाच्या आकडेवारीनुसार, भाजप ८१ जागांवर, काँग्रेस ६० तर इतर १४ जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान भाजपच्या वसुंधरा राजे आघाडीवर असून, काँग्रेसचे सहा मंत्री पिछाडीवर आहे.
राजस्थान विधानसभेच्या २०० जागांपैकी १९९ जागांचा निकाल आज रविवारी (दि. ३) जाहीर होत आहे. एका उमेदवाराच्या मृत्यूमुळे त्या जागेसाची निवडणूक नंतर होणार असल्याचे निवडणूक आयोगाने आधीच जाहीर केले होते. राजस्थानमध्ये विधानसभेच्या १९९ जागांसाठी ७५.४५ टक्के मतदान झाले होते. राजस्थानातील १९९ जागांसाठी १८७५ उमेदवार रिंगणात असून, आज त्यांचे भवितव्य ठरणार आहे. आज निकाल जाहीर होत असताना सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये धाकधूक वाढली आहे.
वेगवेगळ्या एक्झिट पोलनुसार राजस्थानात भाजपला संधी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. १९९८ पासून चालत आलेली सत्ता परिवर्तनाची लाट यावेळी थोपवता येईल अशी आशा काँग्रेसला आहे. तर, सत्तांतराची परंपरा, मोदींचा चेहरा आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून झालेले ध्रुवीकरण या आधारे कोणत्याही परिस्थितीत आपल्याला संधी मिळणार असे दावे भाजपच्या गोटातून करण्यात आले आहेत.
सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी भाजप या दोन्हीही पक्षांमधील अंतर्कलह हे यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य होते. त्यामुळे दोन्ही पक्षांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा पुढे न करता केंद्रीय नेतृत्व, स्थानिक मुद्दे, विकास योजनांवर प्रचारात भर ठेवला होता. पण, हिंदुत्व आणि ध्रुवीकरण हाच मुद्दा खऱ्या अर्थाने केंद्रस्थानी राहिला. यंदा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत वाढ दिसून आली. मात्र राजस्थानातील निवडणुकांचा इतिहास मागील तीन दशकांमध्ये सातत्याने सरकार बदलण्याचा राहिला आहे.