मी पक्षाचा अध्यक्ष ; मला कुणाच्या परवानगीची गरज नाही : ज्येष्ठ नेते शरद पवार | पुढारी

मी पक्षाचा अध्यक्ष ; मला कुणाच्या परवानगीची गरज नाही : ज्येष्ठ नेते शरद पवार

पुणे : पुढारी ऑनलाईन : काल कर्जतमध्ये  झालेल्या बैठकीत अजित पवारांनी शरद पवार यांच्यावर शरसंधान केलं. या पार्श्वभूमीवर पुण्यात आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. आपल्या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला शरद पवार यांनी राज्याच्या अवकाळी परिस्थितीवर भाष्य केले. राज्यात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानाची तीव्रता पाहता त्याच्या पंचनाम्याचा वेग अत्यंत कमी आहे. यावेळी अजित पवार यांनी काल अनेक गौप्यस्फोट केले. यावर बोलताना शरद पवार म्हणतात, ‘ मी राजीनामा देतो म्हणायचे कारण काय ? मी पक्षाचा अध्यक्ष आहे. राजीनामा दिल्यानंतर मागे घ्या म्हणून आंदोलन करा हे सांगायची गरज काय ? मला माझ्या पक्षात कुणाच्या परवानगीची गरज नाही. त्यांनी बोललेल्या अनेक गोष्टी मला पहिल्यांदाच समजल्या आहेत. त्यात कोणतेही सत्य नाही. माझ्याकडून त्यांना कोणतेही बोलावणं गेलं नाही. त्यांच्या मागण्यासंदर्भात चर्चा जरूर झाली. पण त्यांनी निवडलेली भूमिका आमच्या पक्षाच्या विचारांशी सुसंगत नव्हती.

लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्यांची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. कोणाला दुसऱ्या विचारधारेसोबत जाण्याचा अधिकार आहे. पण असं करताना यापूर्वीचा निवडणुकीचा फॉर्म त्यांनी राष्ट्रवादीच्या नावाने भरला. राष्ट्रवादीच्या नावाने मतं मागितली. पण भूमिका मात्र पक्षाच्या विचारांशी विसंगत घेतली याचं वैषम्य वाटतं.

शरद पवार यांनी आजच्या बैठकीत लोकसभेसाठी मतदारसंघांचा आढावा घेतल्याचं समोर येत आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांनीही बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड इथून निवडणूक लढवण्याबाबत काल भाष्य केलं होतं. यावर माध्यमांनी छेडलं असता शरद पवार म्हणाले, लोकशाही नुसार कोणत्याही पक्षाच्या नेत्याला कोणत्याही मतदारसंघातून भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. त्याबाबत तक्रार करण्याचे कोणतेच कारण नाही.

मी गेली 60 वर्षं राजकारणात आहे. हा पक्ष कुणी स्थापन केला, वाढवला हे सगळ्यांना माहिती आहे. माझ्याबाबत पक्षात, मतदारसंघात किंवा जनतेला सर्व प्रकारची माहिती आहे. त्यामुळे हा पक्ष कोणाचा आहे याबाबत इतरांनी कितीही, कोणतेही दावे केले तरी सत्य काय आहे ते सर्वांनाच माहिती आहे.

मी भाजपसोबत जाणार नाही : अनिल देशमुख

ज्या पक्षाने मला खोट्या प्रकरणात फसवलं त्यांच्यासोबत जाण्याची माझी अजिबात इच्छा नाही. मी भाजपात जावं यासाठी हसन मुश्रीफ माझ्या घरी पाच तास बसून होते. मला हवं ते खातं देण्याची तयारीही दाखवली होती. पण मी शरद पवार साहेबांसोबत राहणं पसंत केलं.

Back to top button