Ajit Pawar | लोकसभेसाठी ४ जागा लढवणार, अजित पवारांची घोषणा, ठाकरेंच्या जागांवरही डोळा! | पुढारी

Ajit Pawar | लोकसभेसाठी ४ जागा लढवणार, अजित पवारांची घोषणा, ठाकरेंच्या जागांवरही डोळा!

पुढारी ऑनलाईन : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी बारामती, सातारा, शिरुर, रायगड या चार जागा लढवणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज शुक्रवारी (दि.१) स्पष्ट केले. आम्ही चारही ठिकाणी उमेदवार देऊ आणि ते निवडून आणण्यासाठी जिवाचे रान केले जाईल. इतरही काही ज्या जागा आहेत; ज्या विशेषतः भाजप अथवा शिंदे यांच्याकडे नाहीत. त्या ठाकरेंकडे आहेत. तिथल्या जागा आम्हाला पाहिजेत. त्यासाठी एनडीए म्हणून आम्ही वरिष्ठ पातळीवर चर्चा करु, असेही अजित पवारांनी सांगितले.

संबंधित बातम्या 

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी सामोपचाराने जागांचे वाटप करु, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. अजित पवार गटाकडून कर्जत येथे दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी लोकसभा निवडणूक, मराठा आरक्षण, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आदी मुद्यांवर पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

अनिल देशमुख आमच्यासोबत का आले नाहीत?

यावेळी त्यांनी बोलताना अनिल देशमुख आमच्यासोबत का आले नाहीत? यावर खुलासा केला. अनिल देशमुख माझ्याबरोबर होते. त्यांना मंत्रिमंडळात स्थान पाहिजे होते. पण भाजपकडून सांगण्यात आले की आम्ही सभागृहात त्यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांना लगेच मंत्रिमंडळात घेतले तर आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे देशमुखांना घेता येणार नाही असे भाजपकडून सांगण्यात आले. त्यानंतर मंत्रिपद नाही तर मी तुमच्यासोबत येणार नाही, असे देशमुखांनी सांगितले. हे स्पष्ट असून ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

मी कुणाचीही बदनामी करणारा माणूस नाही. वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांनी भेटण्यासाठी बोलावले होते, असेही त्यांनी नमूद केले.

‘तटस्थ राहणे म्हणजे एकप्रकारे भाजपला मदत’

शरद पवारांबद्दल बोलताना ते म्हणाले की मी त्यांच्याकडे राजीनामा मागितला नाही. त्यांनी स्वतःहून दिला. नितिश कुमार, ममता बॅनर्जी, मेहबुबा मुफ्ती, फारुख अब्दुला भाजपसोबत गेले की नाही. मागच्यावेळी आम्हाला शिवसेनेसोबत नेलं. शिवसेना कोण होती?. आम्ही २०१४ मध्ये सगळेजण बसलो असताना आमच्या वरिष्ठांनी बाहेरुन पाठिंबा दिला होता. तो कोणाला दिला होता. भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे त्याचे सरकार आले. त्यानंतर विश्वासदर्शक ठरावावेळी तटस्थ राहिलो. पण तटस्थ राहणे म्हणजे एकप्रकारे भाजपला त्यावेळी केलेली मदत होती, असाही खुलासा अजित पवारांनी शरद पवारांचे नाव घेता केला.

मराठा आरक्षण देताना कुणावरही अन्याय होऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Back to top button