नाशिक : पुढारी वृत्तसेवा- बाजारपेठेसह शहरातील संस्था आणि दुकानांवर असलेल्या इंग्रजी पाट्यांना काळे फासत मराठी पाट्या लावण्याचा मनसैनिकांनी व्यावसायिकांना इशारा दिला. शहरातील कॉलेजरोड परिसरात जोरादार आंदोलन करीत मनसैनिकांनी मराठी पाट्यांचा मुद्दा लावून धरला. तसेच इंग्रजी पाट्या लावल्यास मनसे स्टाइल आंदोलनाचा इशाराही दिला.
मराठी पाट्यांवरून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत मुंबई, पुण्यात आंदोलनाची धार तीव्र केली. त्यानंतर गुरुवारी (दि.३०) नाशिकमध्येही जोरदार आंदोलन करीत मराठी पाट्यांचा मुद्दा लावून धरला. मनसैनिकांनी सकाळच्या सुमारासच शहरातील कॉलेज रोड भागात आंदोलन केले. स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दुकानांवर असलेल्या इंग्रजी पाट्यांना काळे फासले. तसेच मराठी पाट्या लावा अन्यथा खळ्ळ खट्याकने यावर तोडगा काढला जाईल, असा इशाराही व्यापाऱ्यांना दिला. दरम्यान, आंदोलनाबाबत मनसेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले की, अन्य राज्यात व्यापारी व दुकानदार स्वतःहून स्थानिक भाषेतील फलक लावतात. त्यामुळे या विषयावर सक्ती करण्यापेक्षा महाराष्ट्रातील प्रत्येकाला मराठी भाषेविषयी आदर असणे गरजेचे आहे. त्यांनी तातडीने मराठी पाट्या लावाव्यात.
या प्रसंगी मनसे प्रदेश सरचिटणीस तथा माजी महापौर अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष पराग शिंत्रे, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, मनसे कामगार सेना प्रदेश उपाध्यक्ष सलिम शेख, महिला सेना प्रदेश उपाध्यक्ष सुजाता डेरे, मनोज घोडके, नामदेव पाटील, अमित गांगुर्डे, संजय देवरे, मिलिंद कांबळे, उपशहराध्यक्ष सचिन सिन्हा, संतोष कोरडे, विजय आहेरे, अक्षय खांडरे, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, भाऊसाहेब निमसे, साहेबराव खर्जुन, धीरज भोसले, बंटी लबडे,नितीन माळी, प्रमोद साखरे,अर्जुन वेताळ, निकितेश धाकराव यांच्यासह मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही शहरात बहुतांश दुकानांवर इंग्रजी भाषेत फलक आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होत आहे. त्याबाबत दुकानदार तसेच उल्लंघन करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. येत्या आठवडाभरात इंग्रजी पाट्या काढून मराठी पाट्या लावाव्यात, अन्यथा मनसे पुन्हा आंदोलन करेल.
– अशोक मुर्तडक, माजी महापौर, मनसे
सुस्त मनसेला मराठीची ऊर्जा
आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुका लक्षात घेता, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुन्हा एकदा मराठी पाट्यांचा मुद्दा मिळाला आहे. कधीकाळी बालेकिल्ला राहिलेल्या नाशिकमध्ये मनसेची स्थिती सुस्तावलेली आहे. अशात मराठी पाट्यांसाठीचे आंदोलन नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करणारे ठरल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :