जातीवाचक शब्द वापरल्याने भुजबळांवर गुन्हा दाखल करा : मनोज जरांगे | पुढारी

जातीवाचक शब्द वापरल्याने भुजबळांवर गुन्हा दाखल करा : मनोज जरांगे

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : मंत्री छगन भुजबळ यांच्यामुळेच राज्यातील वातावरण कलूषित होत आहे. ते या वयात समाजात तेढ निर्माण करणारी आणि जाती-जातींत दंगली भडकावणारी विधाने करत आहेत. त्यांची भाषा भयंकर आहे. भीमा-कोरेगावच्या संदर्भाने त्यांनी जातीवाचक शब्द उच्चारले आहेत. त्यामुळे सरकारने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मराठा आंदोलन नेते मनोज जरांगे यांनी केली आहे.

सरकारने भुजबळांच्या दबावात येऊन आणि ओबीसी नेत्यांचे ऐकून गोरगरीब मराठ्यांवर अन्याय करू नये, अशी हात जोडून विनंती असल्याचेही ते म्हणाले. ते म्हणाले, मी बोललेल्या विधानाचा आणि जातीचा कुठेच संदर्भ येत नाही. तरीही विनाकारण जातीय रंग दिला जात आहे. मात्र, भुजबळांनी हिंगोलीच्या सभेत जातीवाचक शब्द वापरला. लायकी शब्दात जातीचा विषयच नाही. तुम्ही थेट जातीचा शब्द वापरून दलित बांधवांचा अपमान केला. दलित बांधवांची गरज लागली म्हणून तुम्ही विधाने करत आहात. तुमच्या वक्तव्यांमुळे जाती-जातींत तेढ निर्माण होत आहे. तुम्ही काहीही केलेत तरी मराठा-दलित समोरासमोर येणार नाहीत. सामान्य ओबीसी बांधवांसोबत आमचे शत्रुत्व नाही. परंतु, काही ओबीसी नेत्यांचा विचार चांगला नाही. त्यांची अशी भाषा असताना सरकार झोपले आहे का? त्यांना आवरा; अन्यथा आम्ही सभेत उत्तर देऊ, असेही जरांगे यांनी ठणकावले.

मंत्री आणि ओबीसी नेते भुजबळ यांना स्वराज्य संघटनेने इशारा दिला आहे. याबाबत जरांगे म्हणाले की, संघटना आक्रमक होत आहे. याला भुजबळच जबाबदार आहेत. त्यांची भाषा खूप वेगळी आहे. ते हात-पाय तोडण्याची भाषा करतात. मी मात्र समाजासाठी तंगडी तोडून घेईन. मराठा समाजाने शांतता बाळगणे आवश्यक आहे.

मला भुजबळांनी नवीन नेते म्हटले; मग मी त्यांना जुनाट आणि कुजलेले नेते म्हटल्यावर वाईट वाटण्याचे कारण काय? त्यांच्या पांढर्‍या केसांचा काय उपयोग झाला?
– मनोज जरांगे-पाटील

Back to top button