देशातला सर्वात मोठा सागरी पूल 25 डिसेंबरला होणार खुला | पुढारी

देशातला सर्वात मोठा सागरी पूल 25 डिसेंबरला होणार खुला

ऋषिता तावडे

अलिबाग :  देशातील सर्वात मोठ्या सी-लिंक पूल प्रकल्पाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 25 डिसेंबर रोजी होणार आहे. रायगड, ठाणे, मुंबईसह एक्स्प्रेस वेवरून मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करणार्‍या प्रवाशांना अतिजलद प्रवासाचा मार्ग यामुळे खुला होणार आहे. रायगड जिल्ह्याला दळवळणाची नवीन दिशा मिळणार आहे.

देशातील सर्वात मोठा सागरी पूल ज्याला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक शिवडी – न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक असेही म्हटले जाते, हा एक सागरी पूल आहे, जो मुंबईला-नवी मुंबईशी जोडला आहे. या 21.8 कि.मी. लांबीच्या या सुंदर पुलाचे अधिकृत नाव श्री अटल बिहारी वाजपेयी ट्रान्स हार्बर लिंक, असे ठेवण्यात आले आहे. सेंट्रल मुंबईतील शिवरीहून नवी मुंबईतील शिवाजीनगरला या पुलावरून अवघ्या 20 मिनिटांत पोहोचता येणार आहे. पूर्वी हे अंतर कापण्यासाठी दीड तास लागत होता.

उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी प्रदान करणार

एकूण 21.8 कि.मी. लांबीच्या एमटीएचएलपैकी 16 कि.मी. लांबीचा भाग समुद्राच्यावर आहे. जो मुंबईला नवी मुंबईशी जोडला आहे. वाशी पुलावरून दीड तासाचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत होणार आहे. विशेष बाब म्हणजे एमटीएचएल ब्रिज मुंबई – गोवा महामार्ग, मुंबई – पुणे द्रुतगती मार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच जेएनपीटी बंदर यांना उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी प्रदान करणार आहे.

Back to top button