मराठवाड्यातील रब्बीचा पेरा घटला | पुढारी

मराठवाड्यातील रब्बीचा पेरा घटला

जे. ई. देशकर

छत्रपती संभाजीनगर : या वर्षी दमदार पाऊस झाला नसल्याने रब्बीच्या क्षेत्रात तब्बल 17 टक्के घट झाली आहे. गत वर्षी छत्रपती संभाजीनगर विभागात 17 नाव्हेंबर 2022 पर्यंत 48.97 टक्के रब्बीचा पेरा झाला होता. या वर्षी 17 नोव्हेंबर 2023 रोजी पर्यंत 32.74 टक्केच रब्बीचा पेरा झाला आहे. दरम्यान आणखी रब्बीचा पेरा पूर्ण झाल्या नसल्याने पेर्‍यात वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

छत्रपती संभाजीनगर विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्याचा समावेश आहे. विभागात रब्बीच्या हंगामात रब्बी ज्वारी, गहू, मका, हरभरा, करडई, जवस, तीळ, सूर्यफूल, व इतर गळीत धान्यांचे पिक घेतले जाते. यावर्षी नोव्हेंबर पर्यंत विभागातील
7 लाख 4 हजार 180.28 हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी होणे अपेक्षित होते. आजपर्यंत केवळ 2 लाख 42 हजार 675.12 हेक्टरवरच रब्बीचा पेरा झाला आहे. म्हणजे नोव्हेंबर पर्यंत 32.74 टक्केच रब्बीची पेरणी झाली आहे. या उलट नोव्हेंबर 2022 मध्ये विभागातील 7 लाख 41 हजार 180.28 हेक्टर पैकी 3 लाख 62 हजार 942.98 हेक्टरवर रब्बीचा पेरा झाला होता. याची टक्केवारी 48.97 टक्के होती. म्हणजे या वर्षी सुमारे 17 टक्के घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा पिछाडीवर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमी झाला असल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी रब्बीचा पेरा मोठ्या प्रमाणात घटला आहे. असे असले तरी गेल्या वर्षी व या वर्षीही विभागात छत्रपती संभाजीनगगर रब्बी पेराच्या बाबतीत पिछाडीवरच आहे. गेल्या वर्षी केवळ 24 टक्के पेरा झाला होता तर यावर्षी केवळ 17.55 टक्केच रब्बीचा पेरा झाला आहे. इतर जिल्ह्यात मात्र काही प्रमाणात समाधानकारक रब्बीचा पेरा झाला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button