Chhagan Bhujbal : माझ्या विरोधात बोला पण, ओबीसींसाठी लढा | पुढारी

Chhagan Bhujbal : माझ्या विरोधात बोला पण, ओबीसींसाठी लढा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राज्यातील ओबीसी समाज पूर्णपणे माझ्या पाठिशी आहे. मी एकटा पडलेलो नाही. काही नेते मंडळीची अडचण झाली असेल. काही मंत्री म्हणाले, भुजबळांच्या कार्यक्रमाला जाणार नाही. माझी काही हरकत नाही. कुठेही जा पण ओबीसींसाठी लढा, माझ्या विरोधात बोलले तरी चालेल पण, ओबीसींच्या बाजुने बोला, अशा शब्दांत राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना टोला लगावला आहे.

जालन्यातील अंबड येथे गेल्या आठवड्यात झालेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यात भुजबळ आणि वडेट्टीवार एकाच व्यासपीठावर होते. या मेळाव्यात भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर कठोर शब्दात प्रहार करताना मराठा-ओबीसी समाजात दुरावा निर्माण होईल, अशी वक्तव्ये केल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांनी मंगळवारी नागपूर येथे भुजबळ यांच्या काही विशिष्ट भूमिकेला आमचे समर्थन नसल्याचे स्पष्ट करत भुजबळांच्या कार्यक्रमाला यापुढे उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले. यावर बुधवारी(दि.२१) भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला आहे. भुजबळ म्हणाले की, माझ्या स्टेजवर येऊ नका, स्वतंत्र बैठक घ्या. ओबीसी आरक्षणचा बचाव करणे ही तुमची आणि माझी भूमिका एकच आहे. त्यामुळे तुम्ही रॅली घ्या, बैठक घ्या पण ओबीसीचा लढा सुरू ठेवा. ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात काही नेते माझ्या सोबत येतील काही जातील हे चालूच राहणार आहे. काही लोकांच्या अडचणी असू शकतात, मला त्याबद्दल काही रोष नाही. या लोकांनी त्यांचे मन अंबडच्या सभेत मोकळे केले आहे. कुठेही जा पण ओबीसीसाठी लढा, माझ्या विरोधात बोलले तरी चालले, पण ओबीसीच्या बाजूने बोला, असेही त्यांनी सांगितले. निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीबाबत सुनावणी पार पडली. याबाबत भुजबळ म्हणाले की, निवडणूक आयोग एक प्रकारचे कोर्ट आहे. दोन्ही बाजूचे वकील एकमेकांवर आरोप करत आहेत. आरोप प्रत्यारोप सुरू असतात. निवडणूक आयोग योग्य निर्णय घेईल. अनेक लोक आहेत ज्यांनी पाठींब्याची स्वाक्षरी केली पण ते तिकडे गेले. लाखो लोकांमध्ये दोन-चार लोक इकडे तिकडे गेल्याने फार काही फरक पडेल असे वाटत नाही.

मला शरद पवारांनीही कधी स्क्रिप्ट दिली नाही!

छगन भुजबळ यांना भाषणाची स्क्रिप्ट फडणवीसांनी लिहून दिली होती. त्यामुळेच मराठा आणि ओबीसी वाद निर्माण झाला असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. यावर भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, मला कुणी स्क्रिप्ट देत नाही. मला शरद पवारांनी कधी स्क्रिप्ट दिली नाही, ना कधी अजितदादांनी स्क्रिप्ट दिली. ओबीसीचे स्क्रिप्ट हे मंडल आयोग, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, भारतरत्न आंबेडकर यांचे स्क्रिप्ट आहे, असेही भुजबळ म्हणाले.

नाशिकच्या सभेसाठी जरांगेंना शुभेच्छा : भुजबळ

ईगतपुरी तालुक्यातील शेणीत येथे बुधवारी(दि.२२) मनोज जरांगे-पाटील यांची जाहीर सभा होत आहे. यावर देखील भुजबळ यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली. ते म्हणाले, ‘कोणालाही कुठेही सभा घेण्याचे अधिकार आहेत. मनोज जरांगेना सभेसाठी शुभेच्छा असून त्यांचे नाशिकमध्ये स्वागत आहे. मी इतरांप्रमाणे कोणालाही गावबंदी करत नाही. प्रत्येकाने आपले मत मांडावे, लोकांना जे पटेल त्यांच्या बाजूने लोक जातील.’

हेही वाचा :

Back to top button