सिंधुदुर्ग : आंबा, काजू पीक विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात | पुढारी

सिंधुदुर्ग : आंबा, काजू पीक विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात

कुडाळ; पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवाळीच्या उत्तरार्धात आंबा, काजू पीक विमा योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे. यावर्षी उशिरा का होईना; परंतु पैसे जमा होत असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. शेतकरी व शेतकरी संघटना यांचे प्रयत्न, यासाठी वेळोवेळी केलेली आंदोलने यांना अखेर यश आले असल्याचे दिसून येत आहे.

गतवर्षी आंबा, काजू पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. सुमारे 90 टक्केहून अधिक उत्पन्न घटले होते. यामुळे आंबा, काजूसाठी फवारणी, खते, कीडनाशके यासाठी केलेला खर्चही वसूल झाला नव्हता. अशा स्थितीत नफ्याची अपेक्षा आंबा उत्पादक शेतकरी यांनी सोडूनच दिली होती. त्यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले होते. अशा स्थितीत आंबा उत्पादक शेतकरी यांना फळ पीक विम्याच्या रकमेची प्रतीक्षा होती. या रकमेतून किमान यावर्षीची कीटकनाशके खरेदी करणे शक्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यामुळे शेतकरी विमा रकमेची आतुरतेने वाट पाहात होते. यानंतर शासनाने दिवाळीत आंकबा, काजू विमा रक्कम वितरित करण्यात येणार आहे असे जाहीर केले होते. त्यामुळे आंबा, काजू उत्पादक शेतकरी यांची दिवाळी गोड जाणार असे सांगितले जात होते आणि शासनाने जाहीर केल्याप्रमाणे दिवाळी दरम्यान ही रक्कम शेतकरी वर्गाच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे.

ही रक्कम 30 नोव्हेंबरपर्यंत शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार असे शासनाचे जाहीर केले आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने ही रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होत आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकर्‍यांच्या मोबाईलवर रक्कम जमा झाल्याचे संदेश प्राप्त होत आहेत. सद्यस्थितीत आंबा, काजू हंगामाला सुरवात झाली आहे. अशा स्थितीत ही रक्कम आता पुढील हंगामासाठी उपयुक्त ठरणार असल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

जिल्ह्यात अजूनही बरेच आंबा, काजू उत्पादक शेतकरी या विमा रक्कमेपासून वंचित असून ते या रक्कमेची प्रतीक्षा करत आहेत. त्यामुळे या शेतकर्‍यांची रक्कम लवकरच जमा करण्याची मागणी होत आहे. रक्कम जमा झाली तरच फवारणी व विमा हप्ता भरणे शक्य होणार आहे.

Back to top button