नाशिक : फटाके फोडण्यावरून पाथर्डी गाव परिसरात युवकाची कोयत्याने हत्या | पुढारी

नाशिक : फटाके फोडण्यावरून पाथर्डी गाव परिसरात युवकाची कोयत्याने हत्या

सिडको : पुढारी वृत्तसेवा फटाके फोडण्यावरून व पूर्वीच्या वादातून काल (मंगळवार) रात्री १० वाजण्याच्या सुमारास मित्रांनीच पाथर्डी गाव लगत स्वराज्य नगर येथे युवकाची कोयत्याने सपासप वार करून खून केला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाणे येथे संशयीत आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करून काहींना ताब्यात घेतले आहे. ऐन दिवाळी सणात खूनाची घटना घडल्‍याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. गौरव तुकाराम आखाडे (वय ३१) असे मृताचे नाव आहे.

या बाबत पोलिसांनी सांगितले की, पाथर्डीगावालगत स्वराज्य नगर येथे रात्री १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान इमारतीच्या खाली गौरव तुकाराम आखाडे (वय ३१) याला फटाके फोडण्यावरून व मागील कारणावरून त्यांच्या व परिसरात राहणाऱ्या मित्रांनी कोयत्याने हल्‍ला केला. या वेळी मित्रांनी गौरवच्या शरिरावर सपासप वार केल्याने तो गंभीर जखमी झाल्याने त्‍याचा मृत्यृ झाला.

घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृत गौरव याची पत्नी सपना आखाडे हिने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयीत आरोपींवर गुन्हा दाखल करून काहींना या प्रकरणी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार, पोलिस निरीक्षक निखिल बोंडे पोलिस उपनिरीक्षक सुभाष सोनार हे करीत आहेत.

हेही वाचा :  

Back to top button