Uttarakhand Tunnel Crash News | मजुरांशी वॉकी-टॉकी वरून संवाद; बचाव कार्याला वेग, आज सर्व कामगारांना बाहेर काढण्याचा प्रयत्‍न | पुढारी

Uttarakhand Tunnel Crash News | मजुरांशी वॉकी-टॉकी वरून संवाद; बचाव कार्याला वेग, आज सर्व कामगारांना बाहेर काढण्याचा प्रयत्‍न

डेहराडून ; पुढारी ऑनलाईन उत्तराखंडमध्ये बोगद्यात अडकलेल्या ४० मजुरांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एका निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळला होता. त्यानंतर बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी सातत्याने बचावकार्य सुरू आहे. सध्या हे बचावकार्य वेगवान करण्यात येत आहे. बचाव पथकातील अधिकाऱ्यांच्या मते आज बचावकार्य पूर्ण करण्यात येईल.

आत अडकलेल्‍या सर्व कामगारांशी वॉकीटॉकीवरून संवाद साधण्यात आला आहे. यात झारखंडच्या काही कामगारांशी त्‍यांच्या त्‍यांच्या भाषेत संवाद साधून त्‍यांना धीर देण्यात आला. तुम्‍हाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी आम्‍ही सर्व तज्ञ, इंजिनियर आणि तांत्रिक कर्मचारी बाहेर असून, लवकरच तुम्‍हाला बाहेर काढू असा विश्वास त्‍यांनी सर्व कामगारांना दिला. तसेच न घाबरता धीर धरण्याचे आवाहन कामगारांना केले आहे. नवीन ड्रिलिंग मशीनव्दारे पाईप टाकण्याचे काम पुन्हा एकदा वेगाने सुरू करण्यात आले असून, या अडकलेल्‍या कामगारांशी वॉकीटाकीवरून संवाद साधण्यात येत आहे.

डेहराडूनमधील कोसळलेल्या बोगद्यातील बचाव पथकातील अधिकारी अडकलेल्या मजुरांशी सतत संवाद साधत आहेत, त्यांना शांत आणि प्रेरित करण्यासाठी दर तासाला त्यांच्याशी संवाद साधला जात आहे. कामगारांना आश्वासन देण्यात आले आहे की, तज्ञ आणि अभियंते त्यांची सुटका करण्यासाठी चोवीस तास काम करत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून बोगद्याच्या आत असलेल्या कामगारांना औषधे आणि कोरडे रेशन पाठवण्यात आले आहे. बोगद्याच्या आत वीज पुरवठा सुरूळीत सुरू आहे.

उत्‍तराखंडच्या उत्‍तरकाशी मध्ये सिल्‍क्‍यारा-बडकोट बोगद्यात तीन दिवसांपासून ४० कामगार अडकलेल्‍या कामगारांना बाहेर काढण्याचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. सायंकाळी उशिरा बचावकार्यादरम्‍यान दगड मातीचा ढिगारा पडल्‍याने मोठा गोंधळ निर्माण झाला. यामध्ये दोन कामगार गंभीर जखमी झाले. या दरम्‍यान ऑगर ड्रिलिंग मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्‍याने याचा परिणाम बचावकार्यावर झाला. आता हे खराब झालेले मशीन हटवून या कामासाठी नवीन ड्रिलिंग मशीन आणण्यात आले आहे. या साठी जमिनीचेही लेवलिंग करण्यात आले आहे. जानकारांच्या मते आज (बुधवार) सर्व अडकलेल्‍या कामगारांना बोगद्‍यातून बाहेर काढण्यात येईल आणि हे बचावकार्य पूर्ण करण्यात येईल.

रविवारी उत्तरकाशी-यमुनोत्री महामार्गाजवळ भूस्खलनामुळे 40 मजूर निर्माणाधीन सिल्कयारा बोगद्यात अडकले होते. आज (बुधवार) मदत आणि बचाव कार्याचा चौथा दिवस आहे. बोगद्यात 900 मिमी पाईप टाकून बोगद्याच्या आत मार्ग करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मंगळवारी रात्री ऑजर मशिनच्या साह्याने खोदकाम सुरू करण्यात आले. पाईप टाकताना ऑगर ड्रिलिंग मशीनमध्ये बिघाड झाला. प्लॅटफॉर्मही तुटला. त्यामुळे मदत आणि बचाव कार्यावर बराच काळ परिणाम झाला होता. नंतर नवे मशीन आणून पुन्हा वेगाने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

नवीन ड्रिलिंग मशीन बसवण्यासाठी प्लॅटफॉर्म सपाटीकरणाचे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. फलाट मजबूत करण्यासाठी ठोस काम केले जात आहे. त्यानंतर मशिनच्या साह्याने ड्रिलिंग करून पाईप टाकण्यात येणार आहे.

‘बोगद्यात स्टील पाइप टाकला जात आहे’

कामगारांना बाहेर काढण्यासाठी कोसळलेल्या बोगद्याच्या ढिगाऱ्यात स्टीलचा पाइप टाकला जात आहे. मात्र, मंगळवारी दरड कोसळल्याने कामावर परिणाम झाला आहे. ढिगारा खाली पडून दोन बचाव कर्मचारी जखमी झाले असून, त्यांना घटनास्थळी तात्पुरत्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. उत्तरकाशीचे जिल्हा दंडाधिकारी अभिषेक रुहेला यांनी सांगितले की, ‘बरमा मशीन’च्या मदतीने कामगारांना मार्ग देण्यासाठी पाईप टाकण्यासाठी खोदकाम सुरू करण्यात आले. ते म्हणाले, सर्व काही नियोजनानुसार झाले तर आज (बुधवार) पर्यंत अडकलेल्या मजुरांची सुटका केली जाईल.

‘ऑक्सिजन आणि अन्नाची पाकिटे पाठवली जात आहेत’

ड्रिलिंग उपकरणे वापरून 800 आणि 900-मिलीमीटर व्यासाचे स्टील पाईप्सचे दोन्ही भाग एकामागून एक ढिगाऱ्यात टाकणे आणि कामगारांना बाहेर काढण्यासाठी मार्ग तयार करणे ही योजना आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या बोगद्यात अडकलेले लोक सुरक्षित असून ऑक्सिजन, पाणी, अन्नाची पाकिटे आणि औषधे ट्यूबद्वारे पुरवली जात आहेत.

एक कामगाराची तब्‍बेत बिघडली

राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राने सांगितले की, सहा मीटर लांबीचे 900 मिमी व्यासाचे 8 पाईप्स आणि त्याच लांबीचे पाच 800 मिमी व्यासाचे पाईप्स आहेत. पोलीस अधीक्षक (उत्तरकाशी) अर्पण यदुवंशी यांनी सांगितले की, आत अडकलेले सर्व ४० कामगार सुरक्षित आणि निरोगी आहेत. ते म्हणाले, काही औषधे दिली आहेत. अडकलेल्या कामगारांपैकी एकाची तब्येत बिघडली आहे. अडकलेल्या मजुरांपैकी एक असलेल्या गब्बरसिंग नेगीच्या मुलाला मंगळवारी काही सेकंदांसाठी त्याच्या वडिलांशी बोलण्याची परवानगी देण्यात आली.

हेही वाचा :

Back to top button