परभणी – मानवतला मराठा समाज आक्रमक, आ. राहुल पाटलांना परतावे लागले | पुढारी

परभणी - मानवतला मराठा समाज आक्रमक, आ. राहुल पाटलांना परतावे लागले

डॉ. सचिन चिद्रवार

मानवत

मानवत येथे मराठा समाजाच्या आक्रमक भूमिकेमुळे येथील एका दूध शीतकरण केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आलेले परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांना परतावे लागेल. उद्धाटन न करता परत जावे लागल्याची घटना शुक्रवारी ता. २७ घडली.

याबाबत माहिती अशी की, येथील भूषण चांडक यांच्या अमूल दूधसंघ संचलित किसान कृपा दूध शीतकरण केंद्राचे उद्घाटन कार्यक्रम शुक्रवारी ता. २७ सकाळी १० वाजता परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बालकिशन चांडक, डॉ. व्ही. के. पाटील, डॉ. विवेक नावंदर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. परंतु, जोपर्यंत मराठा समाजास आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मराठा समाजाच्या संघटनांनी राजकीय पुढाऱ्यांना तालुका बंदी घातली आहे.

या कार्यक्रमास आ. डॉ. राहुल पाटील येणार असल्याचे समजताच संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष गोविंद घांडगे, गजानन बारहाते, हनुमान मस्के, सुरज काकडे, लक्ष्मण शिंदे, अनंत यादव, दत्ता शिंदे, अमोल भिसे यांनी कार्यकमस्थळी धाव घेतली.

आमदार डॉ. राहुल पाटील येताच त्यांच्यासमोर एक मराठा लाख मराठा व मराठा समाजास आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देऊन आमदार पाटील यांना विरोध केला. यावेळी आमदार पाटील यांनीही समाजदारीची भूमिका घेत मीही आपल्या सोबतच आहे, असे सांगत स्टेजवरून खाली उतरत परत परभणीला निघून गेले.

ताडकळस येथे राजकीय प्रतिनिधींना गाव प्रवेश बंदी

ताडकळस येथे मासिक बैठकीत आंदोलनाला ग्रामपंचायत कार्यालयाने जाहीर पाठिंबा दिला. गावात सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींना गाव प्रवेश बंदीचा सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला.

कोल्हा सर्कलमधून साखळी उपोषण

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मानवत तालुक्यातील कोल्हा येथील सकल मराठा समाजाकडून बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. या संदर्भातील निवेदन प्रशासनाला देण्यात आले बुधवारपासून कोल्हा सर्कलमधून सुरुवात करण्यात आली. कोल्हा पाटी येथील राजे संभाजी चौकात हे साखळी उपोषण सुरू करण्यात आले.

Back to top button